परंपरेला फाटा : पुस्तक दिंडीतून शैक्षणिक वातावरण निर्मिती घाटंजी : परंपरेला फाटा देत हिवरधरा येथील बचत गटातील महिलांनी एकत्र येवून नावीन्यपूर्ण पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली. ग्रंथदिंडी काढून वाणामध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विकासगंगा संस्थेच्या पुढाकारात हिवरधरा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. गावातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी जागृत केले आहे. त्यात या गावातील महिलांनी एक पाऊल टाकत वर्गणी काढून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, वाचन व लेखन साहित्य खरेदी केले. शनिवारी मकर संक्रांतीनिमित्त गावात पुस्तक दिंडी काढण्यात आली. शाळेच्या प्रांगणात एकत्र येवून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासोबतच सुमारे २०० महिलांना वाण म्हणून ग्रामगीतेचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांनी या कार्यक्रमाचा वसा पुढेही चालविणार, गावात शौचालय बांधून स्वच्छ व सुंदर गाव बनविणार, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी डिजीटल शाळा बनविणार, असा निर्धार केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकासगंगा संस्थेचे रणजित बोबडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विनोद गुजलवार, केंद्र प्रमुख संजय इंगोले, शाळा समिती अध्यक्ष गीता आत्राम, सरपंच समीक्षा खडसे, पोलीस पाटील ताई गावंडे, उपसरपंच अमोल मून, मुख्याध्यापक रमेश बेले, संगीता चव्हाण, विनोद गावंडे, विनोद मून, अमित खडसे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शीतल ठाकरे, सुरज राजकोल्हे, नीलेश खडसे, राहुल हांडे, प्रवीण राठोड, वर्षा मेश्राम आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)
हिवरधरा येथे वाणात शैक्षणिक साहित्य
By admin | Updated: January 18, 2017 00:10 IST