वैद्यकीय महाविद्यालय : कमिशन पॅटर्न, कंझ्युमर फोरमला सोईने प्राधान्य, नियम डावललेयवतमाळ : खरेदीतून मिळणाऱ्या कमिशनखोरीने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन चांगलेच चर्चेत आले आहे. तीन लाखांवरील वस्तू ई-निविदा बोलावून खरेदी करण्याचा शासन आदेश आहे. त्यानंतरही रुग्णालय प्रशासन सर्वच भंडार विभागासाठी महाराष्ट्र राज्य स्टेट कंझ्यूमर फोरमकडून कोट्यवधीची खरेदी करत आहे. यातही मर्जीतील कर्मचाऱ्यांची साखळीच येथे तयार करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय मिळून येथे तब्बल सहा भांडार विभाग आहे. या भांडार विभागातून मोठी रॉयल्टी गोळा केली जाते. खरेदीच्या नावाखाली कमिशनखोरीचा धंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाचा प्रमुख बदलला की पहिल्यांदा या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या बाजूने करून घेतो. रुग्णालयातील स्वयंपाकगृह भंडार, रुग्णालय भंडार, महाविद्यालयाचे भंडार, मध्यवर्ती भंडार विभाग आणि सर्जिकल भंडार विभाग येथूनच मोठी उलाढाल केली जाते. या सर्वच विभागातून मोठी रॉयल्टी कॅश केली जाते. त्यासाठी ठराविक संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना येथे नियुक्त्या देण्यात आल्या आहेत तर, दीर्घ अनुभवी असलेल्यांनी सुरुवातीलचा यशस्वी बोलणी केली आहे. येथील भांडार विभागाचा थेट वैद्यकीय संशोधन संचालनालय स्तरावरही वशिला आहे. ही मोठी लिंक असल्याने कोणीच ती तोडण्याचा प्रयत्न करत नाही. त्यासाठी बदली प्रक्रिया राबविणे हा मोठा उपाय आहे. मात्र सर्वांनाच घेऊन - देऊन कामकाज सुरू असल्याने शासन नियमांची पायमल्ली होऊनही त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. राज्य शासनाने ३० आॅक्टोबर २०१५ मध्ये स्वतंत्र आदेश काढून तीन लाखांवरची खरेदी ई-निविदा प्रक्रियेने करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र अजूनपर्यंत येथे ही प्रक्रिया राबविण्यात आली नाही. अनेकदा तर अत्यावश्यक स्थितीत खरेदी केल्याचे दाखविले जाते. यासाठी ई-कोटेशन बोलावून सात दिवसांच्या आत तातडीने खरेदी प्रक्रिया करण्याची तरतूद आहे. मात्र याचा वापर केला जात नाही. तातडीच्या नावाखाली केवळ अनेकदा कागदोपत्रीच खरेदी करण्यात येते अथवा थेट खरेदीचा पर्याय निवडला जातो. (कार्यालय प्रतिनिधी)
लाखोंच्या साहित्य खरेदीत ई-निविदेला खो
By admin | Updated: March 10, 2016 03:12 IST