जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव : वृक्षतोडीला बसणार चाप यवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महसूल विभागाच्या ‘ई क्लास‘ जागेत घनदाट जंगल पसरले आहे. हे जंगल वनविभागाच्या ताब्यात घेण्याची हालचाल सुरू झाली आहे.आत्तापर्यंत हे जंगल वनविभागाच्या कार्यकक्षेत येत नसल्याची सबब पुढे करून स्थानिक वनाधिकारी, कर्मचारी कारवाई टाळत होते. यातून खासगी सर्व्हेनंबरमध्ये वृक्षतोडीची परवानगी काढून ई-क्लासचे जंगल साफ केले जाते. हा प्रकार टाळण्यासाठी आता हे जंगल वनविभागाच्या कार्यकक्षेत घेण्याची तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील आठ हजार हेक्टर ई-क्लास जागेवर जंगल पसरलेले आहे. या जंगलात अनेक मौल्यवान वृक्ष आहेत. मात्र हे जंगल वनविभागाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचा कांगावा करून बरेचदा स्थानिक वनाधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. जंगल तोडीच्या तक्रारी नंतर तेथील तलाठ्यांकडून कारवाई होत होती. तथापि वृक्ष तोडीनंतरच्या कारवाईबाबत तांत्रिक माहिती नसल्याने समस्या निर्माण होत होत्या. शिवाय घटनास्थळ पंचनामे, यात तफावत आल्याने सागवान ठेकेदारांचे फावत होते. तक्रारी होऊनही कारवाई शून्य होती. ई-क्लास जंगलाला लागून असलेल्या खासगी सर्व्हेनंबरमध्ये वृक्ष तोडण्याची परवानगी घेऊन जंगलातून कटाई केली जात होती. जबाबदार यंत्रणाच नसल्याने तस्कारांचे फावत होते. हे प्रकार थांबविण्यासाठी आता स्थानिक वनाधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी) आरक्षितचा दर्जा देणारई-क्लास जंगलाला आरक्षित जंगलाचा दर्जा दिला जाणार आहे. तसा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील मोठी वनसंपदा कायम राखणे सोपे होणार आहे.
ई-क्लास जमिनीवरील जंगल वनविभागाच्या ताब्यात
By admin | Updated: March 6, 2017 01:19 IST