लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : दरवेळी अध्यक्षाच्या निवडीवरून गाजणारे साहित्य संमेलन यंदा उद्घाटकाच्या नावावरून वादग्रस्त ठरले. ख्यातकीर्त लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा वाद सुरू असतानाच शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रती ‘नयनतारां’ना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे या सोहळ्यालाही डाग लागला.९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी यवतमाळात उद्घाटन झाले. या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष तथा यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांचे भाषण सुरू असतानाच प्रेक्षकांमधून गोंगाट सुरू झाला. त्यावेळी तीन महिला नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आढळल्या. त्यांना पोलिसांनी तडकाफडकी ताब्यात घेतले. उद्घाटन कार्यक्रम संपेपर्यंत त्यांना कुणाशीही बोलू देण्यात आले नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही त्यांचे छायाचित्र घेण्यास किंवा चित्रीकरण करण्यास पोलिसांनी मज्जाव केला. संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत या महिलांना रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलीस वाहनात बसवून ठेवण्यात आले होते.रत्नागिरीच्या रश्मी कशाळकर, गोव्यातून आलेल्या डॉ. अनुजा जोशी व आणखी एका महिलेचा यात समावेश होता. त्यांनी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केलेली नव्हती. मात्र निमंत्रण रद्द झालेल्या उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या छापील भाषणांच्या तीन हजार प्रती त्यांनी रसिकांमध्ये वाटल्या. तसेच कार्यक्रम सुरू असताना त्या केवळ सहगल यांचा मुखवटा घालून मूक निषेध नोंदवित होत्या. परंतु, आजूबाजूच्या प्रेक्षकांनी उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहिले आणि कोलाहल सुरू झाला. त्यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या तिन्ही महिला चांगल्या लेखिका असून दरवर्षीच्या संमेलनाला त्या उपस्थित राहतात, असे त्यांच्या परिचितांकडून सांगण्यात आले.
संमेलनात प्रती ‘नयनतारा’ पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:37 IST
ख्यातकीर्त लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा वाद सुरू असतानाच शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रती ‘नयनतारां’ना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे या सोहळ्यालाही डाग लागला.
संमेलनात प्रती ‘नयनतारा’ पोलिसांच्या ताब्यात
ठळक मुद्देउद्घाटनात कोलाहलसहगल यांचे भाषण वाटले, मुखवटेही घातले