वणी : ब्रिटिशांच्या काळात जिल्हा असलेले जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि मोठे शहर म्हणून वणीची ओळख आहे. मात्र या शहराला उपजिल्हा रूग्णालयाने हुलकावणी दिली आहे. वणीपेक्षा लहान असलेल्या दारव्हा येथे उपजिल्हा रूग्णालय झाले, मात्र वणीत अद्याप ते होऊ शकले नाही. वणी तालुक्यात वेकोलिच्या विविध १५ भूमिगत आणि खुल्या कोळसा खाणी आहेत. या खाणींच्या प्रदूषणाने होपरळून निघालेल्या वणी उपविभागातील जनतेच्या नशीबी अद्याप उपजिल्हा रूग्णालय आले नाही. केवळ ३0 खाटांच्या ग्रामीण रूग्णालयावर तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा भार आहे. उपविभागात पूर्वी वणीसह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यांचा समावेश होता. आता झरीजामणी तालुका पांढरकवडा उपविभागात गेला आहे. या तीनही तालुक्यात ग्रामीण रूग्णालय आहे. वणी उपविभागात प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्याची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. कोळसा वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकही वाढली आहे. दररोज शेकडो वाहनांतून कोळसा वाहून नेला जातो. त्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहे. मात्र गंभीर जखमींना येथे उपचाराची सोय नाही. त्यांना चंद्रपूर अथवा नागपूरला न्यावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसतो. वणीत केवळ ३0 खाटांचे ग्रामीण रूग्णालय आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हे रूग्णालय तोकडे ठरत आहे. रूग्णालयात २0 खाटा वाढणार असल्याची आवई मागे उठली होती. नंतर १०० खाटा होणार असल्याचीही बतावणी करण्यात आली. तथापि, प्रत्यक्षात अद्याप या ग्रामीण रूग्णालयात खाटा वाढल्याच नाही. त्यामुळे उपलब्ध खाटांवरच रूग्णांवर उपचार करावा लागतो. ग्रामीण रूग्णालयाबरोबरच वणी तालुक्यात शिरपूर, कायर, कोलगाव, राजूर येथे चार प्राथमिक आरोग्य केंदे्र आहे. त्या अंतर्गत २६ आरोग्य उपकेंद्रे आहेत. ही केंद्रे आणि उपकेंद्रहीे वाढत्या लोकसंख्येपुढे कमी पडत आहे. तालुक्याला पूर्णवेळ आरोग्य अधिकारी नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रभारावरच कामकाज हाकले जात आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत आहे. मात्र लोकप्रतिनिधी, प्रशासन, शासन प्रचंड उदासीन आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
उपजिल्हा रूग्णालयाची हुलकावणी
By admin | Updated: December 24, 2014 23:08 IST