सरासरी ३० टक्के पेरण्या आटोपल्या : शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणीसह मारेगाव व झरी तालुक्यात जवळपास ३० टक्के पेरणी आटोपली. बिजांकूरही फुटले. मात्र या पिकाला आवश्यक असलेला पाऊसच आतापर्यंत झाला नाही. त्यात कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, २२ जूनपर्यंत चांगला पाऊसच नसल्याने या पेरण्या धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास बियाणे मातीतच करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा मान्सून लवकर येण्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. जून महिन्याच्या सुरूवातीलाच चांगला पाऊस बरसेल, असा अंदाजही बांधण्यात आला होता. विशेष म्हणजे कधी नव्हे तो मेच्या अखेरच्या आठवड्यात रोहीणी नक्षत्र प्रारंभ होताच, वणी, झरी, मारेगाव तालुक्यात सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्यात. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरेल, असा भ्रम करून वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कपाशीची टोबणी केली. सध्यस्थितीत या तिनही तालुक्यात सरासरी ३० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून वणी व मारेगाव तालुक्यात पाऊसच पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. कपाशीच्या बियाणांची टोबणी केल्यानंतर आता बियाणे अंकूरले देखील आहेत. येत्या दोन तीन दिवसांत कपाशीला पावसाची गरज आहे. मात्र हवामान खात्याचा संदर्भ देत २२ जूनपर्यंत दमदार पावसाची शक्यता नसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी (पंचायत) यांनी ‘लोकमत’ला दिली. गेल्या काही वर्षांत मृग नक्षत्रात अल्प पाऊस पडत आहे. त्यामुळे पेरण्यांचा खोळंबा होण्याचा प्रकार दरवर्षीच घडतो. यंदा मात्र मे महिन्याच्या २४ तारखेला सुरू झालेल्या रोहिणी नक्षत्रातच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी लवकर पावसाला प्रारंभ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. हवामान खात्याचाही तसाच अंदाज होता. परंतु अवकाळी पावसाच्या दमदार हजेरीनंतर पाऊस बेपत्ता झाला. सायंकाळच्यावेळी ढगाळ वातावरण तयार होत असले तरी पाऊस मात्र बरसत नाही, अशीच स्थिती आहे. दमदार अवकाळी पावसानंतर मॉन्सूनचा पाऊस लवकर सुरू होईल, अशी आशा शेतकऱ्यांनाही वाटत होती. मात्र जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला असला तरी हवा तसा पाऊस अद्याप झाला नाही. मात्र अवकाळी पावसाच्या भरवशावर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, ते शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पेरणीसाठी हवा सलग ७० मि.मी.पाऊस पिकांच्या पेरणीसाठी सलग ७० मि.मी.पावसाची गरज आहे. वणी तालुक्यात १ जूनपासून आतापर्यंत ५० मि.मी.पाऊस झाला, तर मारेगावात ८८ मि.मी.पाऊस झाला. झरी तालुक्यात ७७ मि.मी.पाऊस झाला. हा खंडीत पाऊस आहे. जोपर्यंत सलग ७० मि.मी.पाऊस होत नाही तोपर्यंत जमिनीची धूप जात नाही. सध्या मुंबईत जोवर संततधार पाऊस सुरू होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं मॉन्सून राज्यात सक्रीय होत नाही. त्यामुळे सलग ७० मि.मी.पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी युवराज जंगले यांनी केले आहे.
पावसाअभावी खरीप पेरण्या धोक्यात
By admin | Updated: June 15, 2017 01:04 IST