पुसद : पारपंरिक व लोकसंस्कृतीचा वारसा असलेला पोळा हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र या पोळ्यावर दुष्काळाचे स्पष्ट सावट दिसत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून, महत्त्वाचा सण कसा साजरा करावा अशा विवंचनेत आहे. त्याततच पोळ्याच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. पोळा हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांचा सन्मान करणारा सण. श्रमशक्तीचे द्योतक असलेला हा सण राज्यभर पिठोरी अमावस्येला साजरा होतो. मात्र यावर्षी या सणावर दुष्काळाचे सावट दिसत आहे. तसेही गेल्या काही वर्षात यांत्रिकीकरणाने पोळ्यातील बैलांची संख्याही दिवसेंदिवस घटत आहे. गोधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरवर्षी दुष्काळाचा सामना करणारा शेतकरी मोठ्या जिद्दीने उभा राहतो. परंतु निसर्ग त्याला साथ देत नाही. यंदा संपूर्ण जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. शेतातील पिके पाण्याअभावी करपताना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. श्रावण महिन्यात रिमझीम झरी बरसतात. यंदा चक्क उन्ह आहे. अशास्थितीत पोळा अगदी १० दिवसांवर येऊन ठेपला आहे. पोळ्याचा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)
पोळ्यावर दुष्काळाचे सावट
By admin | Updated: August 19, 2014 23:59 IST