लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव(देवी) : पावसाळ्यात पूर, त्यानंतर चिखल आणि उन्हाळ्यात गोटाडीचा रस्ता यामुळे चोरउमरी येथे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी पुलाची निर्मिती करावी, यासाठी गावकऱ्यांनी वारंवार दिलेल्या निवेदनाला केराची टोपली मिळाली आहे. लोकप्रतिनिधींना दिलेल्या निवेदनाची दखल केवळ ‘रेफर टू’पर्यंत घेतली जात आहे. याविषयी नागरिकांमध्ये रोष आहे. आसेगाव(देवी) ते मांगलादेवी मार्गावरील चोरउमरीजवळ असलेल्या नदीवर गेली ७० वर्षांपासून पूल बांधण्यात आलेला नाही. या मार्गावरून एसटी बसेस, खासगी वाहने, दुचाकी, बैलगाडी आदी प्रकारच्या वाहनांची सतत ये-जा सुरू असते. पावसाळ्यात मात्र नदीला पूर आल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प होते. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नदीतून दगडावरून वाट काढावी लागते. दुचाकीस्वारांना तर उतरूनच मार्ग काढावा लागतो. वाहन कुठे घसरून पडेल याचा नेम नाही. सदर ठिकाणी पूल बांधण्यात यावा, या मागणीचे निवेदन आसेगाव(देवी) येथील लीना भूपेंद्र लुणावत यांनी २९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या समाधान शिबिरात दिले होते. कळंब तहसीलदारांनी या निवेदनाची प्रत बाभूळगाव तहसीलदारांना पाठविली. तेथून पुढील कारवाईसाठी १७ एप्रिलच्या पत्रानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पत्र पाठविण्यात आले. दाखल झालेल्या तक्रारीवरून पाच महिन्यांचा कालावधी लोटला. प्रत्यक्षात कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.
चोरउमरी येथे पुलाअभावी अपघाताचा धोका
By admin | Updated: May 17, 2017 00:55 IST