बालकांवरील अत्याचाराचे प्रकरण : संस्थाध्यक्षांना पोलीस कोठडीवणी : स्थानिक ड्रीम्स् प्ले स्कूलमधील बालकांवरील अत्याचारप्रकरणी पोलिसांनी दोन बस जप्त केल्या आहेत. ज्या दोन स्कूलबसमध्ये मुलांवर अत्याचार केले जात असल्याचा आरोप आहे, त्या दोन बस (एम.एच-२९-पी ८७९३ व एम.एच.२९-टीसी १०७) वणी पोलिसांनी शनिवारी जप्त केल्या आहेत. या बस भाड्याच्या असल्या तरी त्यावरील चालक हे या बसचे मालक होते. त्यांच्यात वर्षभराचा करार झाला होता. दरम्यान, संस्थाध्यक्ष दीपक जीवने यांना शनिवारी दुपारी यवतमाळ येथील न्यायालयापुढे उभे केले असता, न्यायालयाने त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बजावले. कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने वणी पोलिसांनी ड्रीम्स प्ले स्कूलपुढे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. या प्रकरणात शाळेच्या महिला प्राचार्य व एका महिला संचालकाचीही चौैकशी करण्यात येत असल्याची माहिती ठाणेदार मुकूंद कुळकर्णी यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)ड्रीम्स स्कूलकडे स्वत:च्या बस नाहीतस्वस्तिक बहुद्देशिय संस्थेचे अध्यक्ष दीपक जीवने यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, शाळेला स्वत:ची स्कूलबस नाही. त्यामुळे शहरातील विविध भागातून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी संस्थेने चार स्कूल बस भाडे तत्वावर घेतल्या आहेत. संस्थेच्यावतीने प्रत्येक बसमध्ये एका महिला कर्मचाऱ्याची संस्थेच्यावतीने नियुक्ती करण्यात आली आहे. एका बसमधील चालक विद्यार्थ्यांशी लैंगिक चाळे करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितले. मात्र पालकांनी असे प्रकार होत असल्याची तक्रार यापूर्वी व्यवस्थापनाकडे कधीही केली नाही. या प्रकाराबाबत व्यवस्थापन अनभिज्ञ होते. चार दिवसांपूर्वी काही पालकांनी ही बाब व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकसभा घेण्यात आली. त्यानंतर लगेच संबंधित चालकाला कामावरून काढण्यात आले. शाळेत असा प्रकार होत नसल्याबाबत सीसीटीव्हीचे फुटेज दाखवून पालकांचे समाधान करण्यात आले होते, अशी माहितीही जीवने यांनी दिली. सदर चालकाविरोधात व्यवस्थापनच तक्रार करायला तयार होते. मात्र पालकांनी नाव उघड होऊ नये, अशी भूमिका घेतल्याने व्यवस्थापन तक्रार दाखल करू शकले नाही. आता शाळा व्यवस्थापन आरोपीला शिक्षा होण्यासाठी पोलीस व पालकांना आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे दीपक जीवने यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शाळेतील शौचालयात बंद करण्याची घृणास्पद शिक्षा दिली जात असल्याचा आरोप पालकांनी केला. त्यावर जीवने म्हणाले की, ज्या पालकांनी आपल्या पाल्यास अशी सौम्य शिक्षा करण्याची परवानगी दिली, त्यांच्याच पाल्यांना एक-दोन मिनीट शौचालयात बंद केले जायचे, अशी कबुलीही जीवने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ड्रीम्स् प्ले स्कूलच्या दोन बस जप्त
By admin | Updated: September 11, 2016 01:03 IST