यवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे उद्घाटन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम स्थानिक ‘मेडिकल’ कॉलेज परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात पार पडला. उद्घाटक म्हणून नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार संदीप तामगाडगे लाभले होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रशांत रोकडे (दिल्ली), तर अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी परिक्षा नियंत्रक डॉ. वाघमारे होते. मंचावर बागडे, ठमके, गवई, बोटे, स्वागताध्यक्ष धर्मराज गणवीर आदी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर गुणवंत मोटघरे यांनी दिलेल्या अभ्यासिकेच्या प्रतिकृती स्थळाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. या अभ्यासिकेशी निगडीत सुरेश रामटेके, ओमप्रकाश नगराळे यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल शाल, पुष्प व गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटनपर भाषणात संदीप तामगाडगे म्हणाले, प्रत्येकाला जीवनात उत्कृष्ट संधी कधी ना कधी प्राप्त होते. त्या संधीला ओळखून त्याचं सोनं करायची किमया ज्याला साधता आली तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो. प्रामाणिकपणे स्वयंअध्ययन केल्यास यशस्वी होता येते, हे त्यांनी सांगितले. जे विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी उत्सूक असतील त्यांनी पदवी प्रवेशत घेतल्यापासूनच आपल्या शैक्षणिक अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करावा, असा सल्ला डॉ. प्रशांत रोकडे यांनी दिला. याशिवाय पालकांनी आपल्या पाल्यांमधील सूप्त गुण ओळखून त्यांच्या गुणांना प्रोत्साहन द्यावे, ज्यामुळे मुलांच्या खऱ्या गुणांना न्याय देता येईल. त्यांच्या आवडीनुसार त्यांचे यशस्वी भविष्य घडविता येईल, असे ते म्हणाले. उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या भविष्यासंबंधातील उपाय योजनांबाबत अभ्यासात येणाऱ्या अडचणींबाबत प्रश्न विचारले. त्याचे मान्यवरांनी समाधानकारक उत्तर दिले.प्रास्ताविक युवराज मेश्राम, संचालन जय भगत, आभार अभियंता संजय मानकर यांनी मानले. (वार्ताहर)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका
By admin | Updated: September 26, 2016 02:40 IST