चिखलीची घटना : नवव्या वर्गात होता शिकतपुसद : सुटी असल्याने गावाशेजारच्या नाल्यावर पोहण्यासाठी गेलेल्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील चिखली कॅम्प येथे रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. तो नवव्या वर्गाचा विद्यार्थी होता. ज्ञानेश्वर मधुकर नेवरकर (१६) रा. हिवरी ता. हदगाव जि. नांदेड असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो चिखली कॅम्प येथील वसंतराव नाईक आश्रमशाळेत शिकत होता. याच शाळेच्या वसतिगृहात राहत होता. रविवारी सुटी असल्याने दुपारी तो गावालगतच्या नाल्यावर पोहण्यासाठी गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. हा प्रकार नंतर नाल्यावर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. त्यांंनी आरडाओरडा करून वसतिगृह गाठले. तोपर्यंत गावकऱ्यांनाही या घटनेची माहिती झाली. त्यांनी नाल्यावर जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मृतदेहच हाती लागला. या घटनेची माहिती पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)बंधाऱ्याच्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू नेर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोदलेल्या बंधाऱ्यात वाकून पाहताना पडल्याने एका १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खरडगाव येथे रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. पीयूष गजानन शिंदे रा. खरडगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी पीयूष आपल्या मित्रासोबत शेताकडे जात होता. रस्त्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोदलेला बंधाऱ्याचा मोठा खड्डा आहे. या खड्ड्यात वाकून पाहताना पीयूषचा तोल गेला आणि खड्ड्यातील पाण्यात पडला. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. (तालुका प्रतिनिधी)
वसतिगृहाच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
By admin | Updated: July 13, 2015 00:07 IST