उमरखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन लावू नका, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवदेनातून केली आहे. येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रहारने निवेदन पाठविले.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बहुतांश जिल्ह्यात संचारबंदी तसेच लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले. मात्र, लाॅकडाऊन हा पर्याय नाही, असे प्रहारने म्हटले आहे. दुकानांच्या वेळेत बदल करणे, गर्दीवर नियंत्रण् मिळविणे, सोशल डिस्टंसिंग, मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे कडक निर्देश द्यावे, अशी मागणीही केली.
गतवर्षी २०२० मध्ये सामान्य जनतेला आठ महिने घरात बसावे लागले. त्यामुळे होतकरू, हॉटेल चालक, मंडप डेकोरेशन, हातगाडीवाले, पानटपरीवाले, हमाल व इतर व्यावसायिक तसेच युवकांची आर्थिक परिस्थिती खालावली. ते पूर्णपणे हतबल झाले. आता पुन्हा लॉकडाऊन लावल्यास ते अडचणीत येतील. वाढत्या बेरोजगारीच्या अनुषंगाने आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लॉकडाऊनला जिल्ह्यापासून दूर ठेवावे, अशी मागणी केली.
महाराष्ट्रात कोरोना वाढत असून, हजारपेक्षा अधिक संख्या दिसून येत आहे. मात्र, यात खोटे पॉझिटिव्ह रुग्ण दाखवून काही कोविड तपासणी केंद्रांकडून कोरोना विमा काढण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये हडपण्याचा प्रकार अमरावती येथे पाहायला मिळाला. काही डॉक्टरांना हाताशी धरून निगेटिव्ह असणारे अहवाल पॉझिटिव्ह दाखवण्याचा प्रताप सुरु आहे. या प्रकारामुळे काही व्यक्ती भीतीनेच प्राण सोडत आहेत.
बॉक्स
कोविड तपासणी केंद्रांवर लक्ष ठेवा
अमरावती येथे घडलेला प्रकार आपल्या जिल्ह्यात घडण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड तपासणी केंद्रांवर विशेष समिती नेमून त्यांच्या अहवालांची चौकशी करावी, दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दंड आकारावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख सय्यद माजीद, शहरप्रमुख राहुल मोहितवार, अंकुश पानपट्टे, अवधूत खडकर, विवेक जळके आदी उपस्थित होते.