बी.संदेश - आदिलाबादमहाराष्ट्रात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने सीमावर्ती भागातून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात असताना निवडणुकीदरम्यान मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने चक्क पैनगंगा नदीतूनच देशी दारूची तस्करी होत आहे.आदिलाबाद जिल्ह्याची सीमा महाराष्ट्राच्या ४०० किलोमीटरपर्यंत लागली असल्याने येथे तस्करीचा प्रकार सुरू आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भोकर, किनवट, केळापूर, वणी, राजूरा, सिरोंचा व चंद्रपूर या विधानसभा क्षेत्राला लागून असल्याने येथे स्थानिक तरबेज मच्छीमारांकडून देशी दारूची आदिलाबाद जिल्ह्यात साठवणूक करण्यात येत आहे. काही व्यापारी निवडणुकीदरम्यान अशी साठेबाजी करून बेभाव विक्री करीत आहे. जिल्ह्याच्या सीमेलगतच्या बेला, जैनथ, तामसी, तलमडगू या मंडळामध्ये महाराष्ट्रातील काही राजकीय लोकांचे नातेवाईक राहात असल्याने तेसुद्धा या कामी त्यांची मदत करीत आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्याच्या करंजी, अर्ली, वडूर, राजमपेठा, सगदा, अर्ली (लहान), सांगडी, अंतापूर, सावंगी, दूरबा, दिग्रस आदी गावातसुद्धा तस्करीच्या दारूची साठवण करण्यात येत आहे.दरम्यान, केळापूर मतदारसंघातील पाटणबोरीच्या पिंपळखुटी चेकपोस्टसमोरूनच मोठ्या प्रमाणात रात्री देशी दारूची तस्करी होत आहे. उल्लेखनीय की जेथे जुने चेकपोस्ट होते तेथे काही पोलीस चिरीमिरी घेवून तस्करांना मदत करत आहे. दरम्यान, एरवी महाराष्ट्रातील ३० रुपयांची देशी दारूची एक निप येथे ६० रुपयांत विकली जात असल्याने देशी दारूची किंमत दुप्पट मिळते. जिल्ह्यात सीमावर्ती भागातून येणारी हजारो लिटर देशी दारू जप्त करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमेवर तीन पोलीस पथक अवैध दारू पकडत असल्याचे दारूबंदी कमीशनर शिवराज यांनी सांगितले.
पैनगंगा नदीतून देशी दारूची तस्करी
By admin | Updated: October 5, 2014 23:14 IST