शेंबाळपिंपरी : पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला बुधवारी दुपारी १.३० वाजता मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गावातील एका तरुणाविरुद्ध तक्रार देण्यात आली. डॉ. अनिल भावसार शेंबाळपिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे १२.३० पर्यंत रुग्णांची तपासणी केली. आणि त्यानंतर ते आपल्या शासकीय निवासस्थानी गेले. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गावातील धम्मपाल पंडित (३०) हा तरुण त्यांच्या निवासस्थानी आला. आमच्या पेशंटला तपासण्यासाठी तत्काळ चला असे त्याने म्हटले. त्यावर डॉक्टरांनी तयार होऊन येतो असे सांगताच धम्मपालने डॉ.भावसार यांना मारहाण सुरू केली. त्यावेळी परिसरातील काही नागरिकांनी मध्यस्थी केली. या प्रकरणाची तक्रार डॉ. अनिल भावसार यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दिली आहे. वृत्त लिहेस्तोवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. आरोपी धम्मपाल पंडित हा दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी त्याने गावात असलेली पोलीस चौकी पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. गावात नेहमीच तो दहशत निर्माण करीत असल्याची माहिती आहे. (वार्ताहर )
शेंबाळपिंपरीत डॉक्टरांना मारहाण
By admin | Updated: August 6, 2015 00:01 IST