यवतमाळ : ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी शासनाने निरनिराळ्या उपक्रमांना सुरूवात केली. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने ‘डॉक्टर तुमच्या गावी’ या योजनेचा प्रारंभ केला होता. मात्र काही दिवसांतच ग्रामीण भागात ही योजना लुप्त झाली आहे.शासनाने नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची ठिकठिकाणी स्थापना केली. या केंद्रांतून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या दिमतीला ग्रामीण भागात लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार अनेक उपकेंद्रांची निर्मितीही करण्यात आली. मात्र केंद्र आणि उपकेंद्रांतून नागरिकांना समाधानकारक सेवा मिळत नव्हती. या केंद्रांमध्ये आरोग्य सेवा घेणाऱ्या सामान्य नागरिकांची संख्या अधिक होती. त्यांना सहज आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणे मात्र दुरापास्त झाले होते. ग्रामीण जनतेच्या आरोग्यविषयक वाढत्या तक्रारी लक्षात घेता शासनाने ‘डॉक्टर तुमच्या गावी’ ही योजना सुरू केली होती.सन २००७ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आला. मात्र सध्या ही योजना कोलमडल्याचे दिसून येत आहे. तालुका आरोग्य विभागाला या योजनेचा एकप्रकारे विसरच पडला आहे. अनेक गावे व पोड, असे आहेत की त्या ठिकाणी अद्यापही आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात पोहोचली नाही. मुख्य गावात आरोग्य केंद्राची निर्मिती झाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना मात्र त्यांच्याच कार्यक्षेत्रातील गावांची आरोग्यविषयक समस्या सोडविता येत नसल्याचे वास्तव आहे. आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अनेक उपकेंद्रात तर डॉक्टरांची नियुक्ती न केल्याने रूग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार करवून घ्यावे लागतात. योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
‘डॉक्टर तुमच्या गावी’ योजनेचा पडला विसर
By admin | Updated: November 2, 2015 01:54 IST