महिलांचा पुढाकार : शेतात जाऊन दिले फराळाचे साहित्यउमरखेड : दिवाळी सणाच्या आनंदापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून येथील इनरव्हील क्लबच्या महिलांनी ऊस तोडणी कामगारांसोबत दिवाळी साजरी केली. ऊस तोड मजुरांना फराळाचे पदार्थ देऊन त्यांच्यासोबत एक दिवस घालविला. उमरखेड इनरव्हीलच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोटाची खडगी भरण्यासाठी शेकडो मजूर ऊस तोडणीच्या कामावर जातात. सणवारातही त्यांच्या नशिबी गावी जाणे नसते, असेही कुटुंब आपल्या चिलापिलांसोबत उसाच्या शेतात राहुटीला असतात. उमरखेड येथील नांदेड मार्गावर भोयर यांच्या शेतात ऊस तोड मजूर गत काही दिवसांपासून ऊस तोडीचे काम करीत आहे. काबाड कष्ट करणाऱ्या या मंडळींना दिवाळी सणाचा आनंद उपभोगता यावा म्हणून इनरव्हीलच्या महिलांनी पुढाकार घेतला. सोमवारी या महिला नांदेड रोडवरील शेतात पोहोचल्या. त्या ठिकाणी जाऊन सर्व मजुरांना दिवाळीचा फराळ आणि इतर साहित्य दिले. ही सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी उमरखेड इनरव्हीलच्या अध्यक्ष चित्रलेखा देवसरकर, आशाताई देवसरकर, जयश्री देशमुख, डॉ. विमल राऊत, ऋतुजा जाधव, कुसुम गिरी, मीनाक्षी गायकवाड, मीना बोनगुलवार, सविता कदम, अनसूया मुडे आदी सहभागी झाल्या होत्या. (शहर प्रतिनिधी)
ऊस तोड मजुरांसोबत ‘इनरव्हील’ची दिवाळी
By admin | Updated: November 10, 2015 03:12 IST