विठ्ठल कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : घरात अठराविश्व दारिद्र्य. त्यात आई पूर्णपणे मुकी अन् बहिरी. यात कुटुंबाचा गाडा हाकणे म्हणजे तारेवरची करसतच. या कष्टदायक स्थितीतही सावरगाव येथील पार्वतीची शिक्षणासाठी झुंज सुरू आहे.अनिता राजुरकर ही दिव्यांग भगिनी. ती जन्मताच कर्णबधीर. तिला दोन मुली व एक मुलगा आहे. त्यात पार्वती सर्वात मोठी. कौटुंबिक कलहामुळे अनिता काही वर्षांपूर्वी आपल्या मुलांसह माहेरी सावरगाव येथे आली. आता मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी अनिता यांच्यावरच आहे. कर्णबधीर अनिता व पार्वतीच्या वाट्याला दारिद्र्य आले. स्वत:चे घरही नाही. त्यात मुक्या, बहिऱ्या आईचा जगण्याचा संघर्ष पार्वतीला अस्वस्थ करीत राहिला.खडतर जीवन जगणाºया आईला आधार मिळावा म्हणून आता सहावीत शिकणारी पार्वती रोजमजुरीला लागली. आईला आधार देऊ लागली. मात्र यामुळे पार्वतीच्या शिक्षणात बाधा निर्माण झाली. रोजमजुरी करावी की शाळा, असा प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला. एका शनिवारी सकाळी शाळेतील सर्व विद्यार्थी शारीरिक शिक्षणाचे पाठ गिरवीत होते. त्यावेळी पार्वती दूर उभी राहून त्यांना न्याहाळत होती.पार्वती शाळेच्या प्रवेशव्दारावरून हा प्रकार न्याहाळत असल्याचे शिक्षक रवि आडे यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच पार्वतीची चौकशी केली. त्यावेळी ही हकीकत समोर आली. आडे यांनी पार्वतीला शाळेत दाखल करावे, या विचाराने तिच्या झोपडीकडे धाव घेतली. मात्र तिला दाखल करताना अनंत अडचणी आल्या. तिच्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न, यापूर्वी ज्या शाळेत शिकत होती, त्या शाळेची टीसी मिळविताना दमछाक झाली. तथापि पार्वतीला शाळेपासून वंचित ठेवण्यास कोणीही रोखू शकले नाही. यासाठी भाऊ गव्हाणे यांनीही मदत केली. अखेर सावरगाव येथे सहावीत पार्वतीला दाखल करून घेण्यात आले.अनिताला समाजाकडून मदतीची गरजजन्मताच मुकी आणि बहिरी असलेल्या अनिताच्या पोटी पार्वती आली. तिची जिद्द बघून आता ती सहावीत शिकतही आहे. मात्र अनितासमोर कुटुंबाचा गाडा हाकण्याचा सवाल आहे. पार्वतीने मदत केल्यास तिचे शिक्षण अर्ध्यावरच राहणार आहे. त्यामुळे पार्वतीच्या आईला मदतीची गरज आहे. तिच्या मदतीसाठी समाजातील दातृत्व पुढे येईल काय असा प्रश्न आहे. या मायलेकींना मदतीचा हात मिळाल्यास त्यांचे जीवन थोडे फार सुकर होण्याची शक्यता आहे. शिक्षकांनी पार्वतीला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. ती पूर्वी माथार्जुन ता.झरीजामनी येथे शिकत होती. नंतर शाळाबाह्य झालेली पार्वती आता सावरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवीत आहे.
दिव्यांग मातेच्या पार्वतीची झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:41 IST
घरात अठराविश्व दारिद्र्य. त्यात आई पूर्णपणे मुकी अन् बहिरी. यात कुटुंबाचा गाडा हाकणे म्हणजे तारेवरची करसतच. या कष्टदायक स्थितीतही सावरगाव येथील पार्वतीची शिक्षणासाठी झुंज सुरू आहे.
दिव्यांग मातेच्या पार्वतीची झुंज
ठळक मुद्देज्ञानाचे धडे : घाटंजीच्या मुलीची परिस्थितीशी एकाकी लढाई