कारवाईचे संकेत : महसूल-जिल्हा परिषद बांधकाममध्ये खळबळ उमरखेड : उमरखेड तालुक्यातील ८० पांदण रस्त्यांची कामे रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महसूल आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली. पांदण रस्त्यांची कामे का सुरू केली नाही याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना मागितला आहे. या अहवालानंतर संबंधितांवर कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहे.सहा महिन्यांपासून उमरखेड तालुक्यातील ८० पांदण रस्त्यांची कामे रखडली आहे. या पांदण रस्त्यांसाठी १८ कोटी ६० लाख रुपये मंजूर आहेत. परंतु त्यानंतरही परजना ते साखरा, पोफाळी ते अंबाळी, बारा ते बेलखेड, झाडगाव ते विडूळ, अंबाळी जंगल ते अंबाळी गाव, बारा ते पैनगंगा, ब्राम्हणगाव ते चातारी, ढाणकी, निंगनूर, बिटरगाव, मोरचंडी, मुरली, पिंपळगाव, चुरमुरा, मानकेश्वर, तरोडा, टाकळी, मरसूळ, कृष्णापूर, लोहरा, मार्लेगाव, बाळदी आदी गावातील पांदण रस्त्यांचा समावेश आहे. काही पांदण रस्त्याचे काम अर्धवट तर काही पांदण रस्त्यांना सुरुवातही झाली नाही. याबाबतचे वृत्त १३ मे रोजी ‘लोकमत’मधून प्रकाशित झाले. याची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी घेतली. त्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल उमरखेडचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याकडे मागितला. यामुळे महसूल प्रशासन व जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पांदण रस्ता कामात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहे. (शहर प्रतिनिधी)आमदारांनी केली चौकशीची मागणीदुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी पांदण रस्त्याचे काम महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु कामच रखडल्याने मजुरांच्या हाताला काम मिळाले नाही. तसेच रस्ते रखडल्याने शेतकऱ्यांनाही त्रास होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या कामात दिरंगाई करणाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी केली आहे. विकासात्मक कामात हयगय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. हालचालींना वेग‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महसूल प्रशासन व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रखडलेल्या रस्त्यांच्या कामाला गती देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. बांधकाम विभागाकडून दोन दिवसात अनेक गावच्या पांदण रस्त्याच्या कामासाठी मजुरांनी मागणी केली आहे. त्यामुळे थंडबस्त्यात पडलेली कामे लवकर सुरू होण्याची आशा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला पांदण रस्त्यांचा अहवाल
By admin | Updated: May 16, 2015 00:01 IST