यवतमाळ : राज्य शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली. प्रतिष्ठेचा जिल्हा गुणवंत क्रीडा कार्यकर्ता-संघटक पुरस्कार प्रा.डॉ.सुभाष डोंगरे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार गणेश रंगराव शिरसाठ तर महिला गटात खेळाडूचा पुरस्कार स्विटी मुरलीधर झेंडे यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरुष गटातील एकही खेळाडू पुरस्कारासाठी पात्र ठरला नाही.दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २६ जानेवारी रोजी पोस्टल मैदानावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मिनी छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणूनही हा पुरस्कार ओळखला जातो. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून केवळ १२ अर्ज आले होते. गुणवंत क्रीडा संघटकाचा पुरस्कार मिळालेले प्रा.डॉ.सुभाष डोंगरे मलखांब खेळात लवचिक खेळाडू घडविणारे म्हणून प्रसिद्ध आहे. १९९२ पासून ते मलखांब खेळाचा प्रचार व प्रचार करीत आहे. महाराष्ट्र हौशी मलखांब संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. राज्य स्पर्धेचे आयोजन त्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. मलखांब खेळात अनेक राष्ट्रीय खेळाडू त्यांनी तयार केले. त्यांचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दोनवेळा सत्कार केला आहे.जिल्हा क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार मिळालेले गणेश शिरसाठ नेहरू स्टेडियम येथे जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात हॅन्डबॉल खेळाचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी ५० च्यावर राष्ट्रीय विद्यापीठस्तरावर खेळाडू घडविले. २०१४ मध्ये त्यांच्या मार्गदर्शनात राज्यस्तरीय स्पर्धेत शालेय हॅन्डबॉल संघाने सुवर्णपदक पटकाविले. महिला गटात उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळविणारी स्विटी झेंडेकर खो-खो खेळातील राष्ट्रीय खेळाडू असून तिने राज्य-राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके पटकाविली आहे. जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, सदस्य सचिव जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रामदास दरणे, डॉ.उल्हास नंदूरकर, मनोज येंडे यांच्या निवड समितीने पुरस्काराची घोषणा केली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
जिल्हा क्रीडा पुरस्कार घोषित
By admin | Updated: January 24, 2015 23:01 IST