दुपारची घटना : कार्यालय परिसरातच हल्लायवतमाळ : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ग्राहक न्यायालयासमोर जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक नरेंद्र नामदेवराव लांजेवार (५३) यांना मारहाण करण्यात आली. ही घटना दुपारी २ वाजता घडली. हल्ला करणाऱ्या इसमाला पोलीस येईपर्यंत पकडून ठेवण्यात आले. त्यानंतर लगेच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्वीय सहायक लांजेवार हे दुपारी लंच ब्रेक असल्याने भोजनासाठी घरी जात होते. वाहनतळातून कार बाहेर काढत असतानाच त्यांच्यावर लोखंडी पट्टीने हल्ला करण्यात आला. इंद्रजित शंकरराव वानखडे (५८) रा. उमर्डा ता. बाभूळगाव असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात लांजेवार यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी लांजेवार यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर आरोपी इंद्रजित वानखडे यांच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, दुखापत होईल अशी मारहाण करणे या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लांजेवार यांच्याकडून फसवणूक झाल्याचे इंद्रजित वानखडे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. या घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर मिळणाऱ्या वागणुकीवरही विविध चर्चेला उधाण आले. (कार्यालय प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकाला मारहाण
By admin | Updated: February 7, 2017 01:19 IST