यवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीदरम्यान सर्व प्रक्रिया विधानसभा व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसारखीच राबवायची आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी यंत्रणेने अधिक दक्ष राहून काम करावे, जिल्ह्यात कुठेही निवडणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.जिल्हाधिकाऱ्यांनी गार्डन हॉलमध्ये निवडणूक यंत्रणेशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, निवडणूक उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुळकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे यांच्यासह जिल्ह्यातील आठही नगरपालिकांचे निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.उमेदवारांना विविध बाबींसाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक खिडकी सुरू करून तेथे वेळेत परवानगी उपलब्ध करुन द्यावी. उमेदवार निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक रणधुमाळी सुरू होईल. त्यापूर्वीच प्रशासनाने सर्व व्यवस्था करुन ठेवणे आवश्यक आहे. मतदान केंद्राची पाहणी, तेथील व्यवस्था, सुरक्षा, पोलीस बंदोबस्त याचे चोख नियोजन करावे. ज्या ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता असते अशा मतदान केंद्रांवर विशेष लक्ष दिले जावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. निवडणूक काळात गैरप्रकार टाळण्यासाठी प्रमुख मार्गावर पोलीस चौक्या उभारण्यात याव्यात. या चौक्यांवर बाहेरून येणारी आणि संशयास्पद वाहने तपासली जावी. या दरम्यान अवैध मद्यासोबत मतदारांना प्रभावित करण्यासाठी होणाऱ्या मद्य वाटपावर उत्पादन शुल्क विभागाने लक्ष ठेवून राहावे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आठही नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. नगरपरिषद निवडणुका जिल्ह्यात शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. या काळात निवडणूक प्रक्रियेत बाधा पोहोचवू शकतील अशा संशयित व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणुकीचा आढावा
By admin | Updated: November 7, 2016 01:13 IST