मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन : सरपंच, तलाठी व ग्रामस्थांची उपस्थिती बाभूळगाव : फाळेगावसारख्या घटना टाळण्याच्या दृष्टीने सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी संयुक्तपणे बैठक घेऊन उपाययोजना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले. ते शुक्रवारी फाळेगाव येथील पांडुरंग कोडापे याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आले असता ग्रामपंचायत कार्यालयात गावकऱ्यांशी हितगुज करीत होते. पांडुरंग कोडापे या इसमाने त्याच्या तीन मुलांना विहीरत ढकलून स्वत: आत्महत्या केली. या घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले. यावेळी त्यांनी मृतक कोडापे याच्या घरी भेट देऊन त्यांच्या आईवडिलांचे सांत्वन केले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, एसडीपीओ विशाल मेहुल, तहसीलदार दिलीप झाडे, पोलीस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड, बीडीओ आर.ए. फडके, सरपंच प्रतिभा पारधी, कमलाकर लांडगे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला फाळेगाववासीयांसोबत संवाद
By admin | Updated: September 10, 2016 00:53 IST