अल्पावधीतच हिरमोड : नव्या सीईओंसाठी शिखर बँकेत चाचपणी यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान सीईओंनी अल्पावधीतच प्रभार सोडल्याने बँकेवर आता पुन्हा सीईओ शोधण्याची वेळ आली आहे. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुरुषोत्तम काकडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद अनेक दिवस रिक्त राहिले. नंतर या पदाचा अतिरिक्त प्रभार सरव्यवस्थापकांकडे सोपविला गेला. ते या पदासाठी सक्षम असल्याचा दाखलाही नुकताच शासनाच्या संबंधित समितीने दिला. मात्र अल्पावधीतच त्यांच्यावरही सीईओंचा हा अतिरिक्त प्रभार सोडण्याची वेळ आली. संचालकांच्या सोईचा कारभार न होणे हे कारण त्यामागे सांगितले जाते. मात्र बँकेच्या व्यवस्थापनातील कुणीही या मुद्यावर बोलण्यास तयार नाही. आता पुन्हा बँकेत नव्या सीईओंचा शोध सुरू झाला आहे. २२ जानेवारीपासून बँकेला प्रभारीही सीईओ नाहीत. अद्याप कुणालाही अतिरिक्त प्रभार दिला गेलेला नाही. सेवा ज्येष्ठतेनुसार उपमहाव्यवस्थापक दरोळी, वादाफळे हे त्यासाठी पात्र ठरू शकतात. बँकेने सीईओ पदासाठी आतापर्यंत चार-पाचदा जाहिरात दिली. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. एकदा सक्षम उमेदवार मिळाला मात्र तो संचालकांच्या सोईचा नसल्याने त्याला नाकारण्यात आले. आता राज्य सहकारी बँकेत या सोईच्या सीईओचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येते. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा बँक सीईओंनी ‘प्रभार’ सोडला
By admin | Updated: February 2, 2016 02:08 IST