उपस्थिती रोडावली : तीन दिवसांच्या सलग सुट्यांचे नियोजनयवतमाळ : धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरूवात झाली. मात्र सुटी नसल्याने जिल्हा परिषदेत दिवसभर दिवाळी सुट्यांचीच चर्चा सुरू होती. तथापि रविवारपासून सलग तीन दिवस सुट्या असल्याने शुक्रवारी कामे आटोपताना शनिवारी लवकर घरी जाण्याचे नियोजन करताना कर्मचारी दिसत होते. प्रकाश आणि मांगल्याचा सण असलेली दिवाळी शुक्रवारपासून सुरू झाली. मात्र जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना धनत्रयोदशीची सुटी नव्हती. शनिवारी नरक चतुर्दशीलाही सुटी नाही. रविवारी लक्ष्मीपूजनाची सुटी आली आहे. यानंतर सोमवार आणि मंगळवारी लागोपाठ सुटी आली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना तीन दिवस सलग सुटी मिळणार आहे. तथापि शनिवारी सुटी नसल्याने कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला. त्यावर मात करीत अनेक कर्मचारी शनिवारी लवकरच कार्यालयातून गायब होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेत शुक्रवारी कर्मचारी सुट्यांचीच चर्चा करताना दिसत होते. त्यासाठी आजच कामे हातावेगळी करण्याकडे त्यांचा कल होता. शनिवारी लवकर घरी जाण्याचे नियोजन करण्यात कर्मचारी गुंग होते. काहींनी तर शुक्रवारीही लवकरच घराचा रस्ता धरला होता. यामुळे अनेक विभागात संख्या रोडावली होती. हीच स्थिती शनिवारी कायम राहण्याची शक्यता आहे. दिवाळीमुळे सध्या कर्मचाऱ्यांचे कामावरील लक्ष विचलीत झाले आहे. खरेदी, मुले यांच्याकडेच त्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. त्याचा परिणाम कामावर होत आहे. मात्र दिवाळीमुळे जिल्हाभरातून जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांचीही संख्या रोडावल्याने कामाचा ताण थोडा कमी झाला आहे. आता सर्वांनाच दिवाळी सुट्यांची प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेमध्ये सुट्यांचीच चर्चा
By admin | Updated: October 29, 2016 00:20 IST