बीडीओंना निवेदन : शिष्टमंडळाने मांडल्या शिक्षकांच्या समस्याआर्णी : तालुक्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडले. तसेच निवेदन सादर करून प्रश्न निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण मानकर, सहदेव चहांदे, तालुकाध्यक्ष राजकुमार खोंडे, सचिव सुधाकर रामटेके यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी किशोर रावते, सहायक गटविकास अधिकारी खरोडे, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव, राऊत यांच्याशी विविध समस्यांवर चर्चा केली. मांडण्यात आलेल्या समस्या १५ दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. सर्व्हिस बुकातील नोंदी अद्यावत कराव्या, वेतन दरमहा एक तारखेला करावे, समस्या निवारण सभा घेण्यात यावी, गोपनीय अहवालाची दुय्यम प्रत मिळावी, वेतनातून कपात झालेले हप्ते संबंधित संस्थेला महिन्याच्या १० तारखेच्या आत पाठवावे, पात्र शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करावी, वैद्यकीय परिपूर्तीचे बिल अदा करावे, इन्कम टॅक्सचे २४-क्यू फॉर्म भरावे आदी प्रश्न यावेळी मांडून तसे निवेदन अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. कास्ट्राईब शिक्षक संघटनेने यापूर्वीही या समस्या मांडल्या होत्या. मात्र त्यावर समाधानकारक कारवाई झाली नाही. पुन्हा या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेतली. जवळपास दोन तासपर्यंत या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सुरेश कुरसंगे, राजू जुनघरे, राजकुमार बनकर, मनिष मानकर, नागोराव कोंपलवार, सिद्धार्थ मेश्राम, प्रशांत वंजारे, विजय प्रकाश गायकवाड, ताराचंद लिंगायत, उत्तम कांबळे, आर.आर. खरतडे, मुजमुले, ताई गजरे आदींची उपस्थिती होती, असे सहदेव चहांदे यांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)
कास्ट्राईबची अधिकाऱ्यांशी चर्चा
By admin | Updated: November 15, 2015 01:43 IST