तरुणी दगावली : १४ जणांवर उपचार सुरू राळेगाव : तालुक्यातील खेमकुंड येथे डायरियाची लागण झाली असून एका तरुणीचा मृत्यू झाला तर १४ जणांवर उपचार सुरू आहे. वरद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे खेमकुंड ६२४ लोकसंख्येचे गाव आहे. या गावात बुधवारी रात्रीपासून डायरियाची लागण झाली. त्यात येथील अश्विनी मारोती सावरकर या १६ वर्षीय तरुणीला प्रथम खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळला नेत असताना वाटेतच तिचे निधन झाले. तर खेमकुंंड येथे सात आणि वरद येथे सात अशा १४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून यवतमाळचे आरोग्य पथकही येथे पोहोचले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय जिद्देवार, डॉ. संजय चिद्दरवार रुग्णांवर लक्ष ठेऊन आहे. उपविभागीय अधिकारी मोहन जोशी, तहसीलदार सुरेश कव्हळे, गटविकास अधिकारी मोहन खेडकर, पंचायत समिती सभापती अशोक केवटे यांनी खेमकुंडला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. दूषित पाण्यामुळे डायरियाची साथ पसरल्याचा संशय व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
खेमकुंड येथे डायरियाची लागण
By admin | Updated: June 20, 2014 00:05 IST