नेर : नेर तालुक्यात येत असलेल्या मालखेड(बु) येथील विविध कामे निकृष्ट झाली आहेत. भ्रष्टाचाराची वाळवी लागलेल्या या कामांच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामसेवकाला विचारणा केल्यास वरिष्ठांकडे बोट दाखविले जाते. त्यामुळे या ग्रामसेवकाच्या माध्यमातून झालेल्या कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मालखेड(बु) येथील सचिवाची मनमानी सुरू आहे. विविध विकास कामांमध्ये गैरप्रकार सुरू आहे. ग्रामस्थ आणि सरपंचांनी विचारणा केल्यानंतर उद्धट उत्तरे दिली जातात. त्यांच्या अंतर्गत झालेल्या येलगुंडा येथील मुंगसाजी महाराज मंदिराजवळ बांधलेल्या पुलाला अल्पावधितच तडे गेले. केवळ एक महिन्यात या कामाचा दर्जा स्पष्ट झाला. दुसरीकडे प्रत्यक्ष झालेल्या खर्चापेक्षा अधिक रकमेची देयकं काढण्यात आले. सदर गावातील नागरिक सचिन माहुरे यांनी याविषयी गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांच्याकडे निवेदन दिले. यावर कारवाई तर झालीच नाही, उलट बीडीओकडून उद्धट वागणुकीचा अनुभव माहुरे यांना आला. सदर अधिकारी ग्रामसेवकाला पाठिशी घालत असल्याचा आरोप माहुरे यांनी केला आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ग्रामसेवकावर कारवाईची मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
मालखेड येथील विकास कामांना भ्रष्टाचाराची वाळवी
By admin | Updated: November 14, 2016 01:23 IST