यवतमाळ : जिल्हा पोलीस भरतीप्रक्रियेत बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याच्या नावावर लेखी परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवाराचे बिंग फुटले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून हे तिघेही मराठवाड्यातील आहेत.अर्जुन सुभाष बेडवाल (२७, रा. पिंपरी जि. औरंगाबाद), रितेश प्रेमसिंग राजपूत (२५ रा. जोजवाडी जि. औरंगाबाद) आणि चरणसिंग चुन्नू काकरवाल (२३, रा. मिहालसिंगवाडी जि. जालना) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील ४१ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची रविवारी लेखी परीक्षा होती. रितेश प्रेमसिंग राजपूत याच्या नावाने परीक्षा देण्यासाठी एक युवक आला. पडताळणी लिपिकाने त्याच्या कागदपत्रांची वारंवार तपासणी केली असता मूळ कागदपत्रावर असलेला फोटो व परीक्षेसाठी आलेल्या युवकामध्ये मोठी तफावत दिसून येत होती. याबाबत त्याला विचारणा केली असता, या युवकाने दोन वर्षांपूर्वीचा फोटो अर्जावर लावल्याचे सांगितले. यावरून संशय बळावल्याने कनिष्ठ लिपिक अभिजित अरुणराव हजारे यांनी संशयित युवकाला पोलीस उपअधीक्षकांकडे हजर केले. तेथे युवकाची कसून चौकशी केली असता आपण अर्जुन बेडवाल असल्याची कबुली त्याने दिली. पेपर सोडविण्यासाठी रितेशकडून २० हजार घेतल्याचे त्याने सांगितले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे चरणसिंग चुन्नू काकरवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या तीनही आरोपींविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)
पोलीस भरती प्रक्रियेत तोतया उमेदवारास अटक
By admin | Updated: April 10, 2017 03:30 IST