पोफाळी ठाणे : छताची चाळणी, स्वच्छतागृहाची वाणवा स्वप्नील कनवाळे पोफाळीउमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीची दैनावस्था झाली आहे. छताची चाळणी झाली असून पावसाळ्यात पाण्याच्या धारा लागतात. यासोबतच स्वच्छता गृहाचीही वाणवा असून महिला कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबना होते. विशेष म्हणजे येथे ३० कर्मचारी असताना शासकीय निवासस्थान मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचारी बाहेरगावहून जाणे-येणे करतात. त्याचा परिणाण शांतता व सुव्यवस्था राखण्यावर होत आहे.पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली. त्याचवेळी या कारखान्याच्या सुरक्षेच्या कारणावरून वसंत कारखान्याच्या जागेतच पोफाळी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. आता या इमारतीची दैनावस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून इमारतीची डागडुजी झाली नाही. त्यामुळे छताची चाळणी झाली. पावसाळ्यात या इमारतीतून पाण्याच्या धारा लागतात. पोलीस ठाण्याच्या खोल्यांमध्ये पाणी साचते. येथील महत्वाची कागदपत्रे ओली होतात. यासोबतच स्वच्छता गृहाचाही अभाव आहे. महिला कर्मचाऱ्यांना अडचणीचे जाते. पोलीस ठाण्याच्या आवारात कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एकाच इमारतीमध्ये आरोपी आणि पोलिसांना रहावे लागते. महिला कर्मचारी आणि महिला आरोपींसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे मन:स्ताप होत आहे.तब्बल ३० कर्मचारी असणाऱ्या पोफाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४५ गावे आहे. ४० किलोमीटरचा परिसर ठाण्याच्या हद्दीत येतो. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागते. विशेष म्हणजे सुरुवातीला टीनशेडमध्ये असलेले पोलीस ठाणे तेथेच पाट्यांच्या पारटेशनमध्ये हलविले. नंतर त्याच ठिकाणी बांधकाम करून इमारत उभी झाली. आतापर्यंत या पोलीस ठाण्याला स्वतंत्र जागा मिळाली नाही. त्यामुळेच इमारतीची डागडुजी आणि निवासाची व्यवस्था झाली नाही. पोलीस ठाणे म्हटले की कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आलीच. परंतु जेथे पोलीस ठाणेच दुसऱ्याच्या जागेत आहेत. तेथे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असणार तरी कशी. पोफाळी येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान नाही. काही कर्मचारी पोफाळी गावात रुम घेऊन राहतात तर काही बाहेरगावरुन जाणे-येण करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडचणीचे जाते. यासंदर्भात वरिष्ठांकडे वारंवार निवेदन देण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत मागणी पूर्ण झाली नाही. पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र जागेसंदर्भात इमारत आणि निवासाच्या व्यवस्थेसाठी वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर मागणी झाली. आता आम्ही पुन्हा पाठपुरावा करीत आहो. यावेळी ही मागणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.- सरदारसिंग ठाकूरठाणेदार, पोफाळी
ठाण्याच्या इमारतीची दैनावस्था
By admin | Updated: June 8, 2015 00:00 IST