लिपिकावर निलंबनाची तलवार : आॅक्टोबरपासून अनियमिततायवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वीय प्रपंच खात्याची रुग्णालयस्तरावर चौकशी करण्यात आली. या अहवालामध्ये संबंधित लिपिकाने अनियमितता केल्याचे ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यासाठी अहवाल शासनाकडे पाठविल्या जाणार आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांकडून विविध उपचारासाठी सेवाशुल्क ही रक्कम जमा केली जाते. आॅक्टोबर २०१४ पासून प्रत्यक्षात पावत्या कमी फाडण्यात आल्याचे दिसून येते. एक प्रकारे रुग्णालयाच्या स्वीय प्रपंच खाते निधीलाच सुरूंग लावण्यात आला. ही बाब ‘लोकमत’ने उजागर केली. त्याची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने चार सदस्यीय चौकशी समिती नेमली. यामध्ये हे धक्कादायक वास्तव पुढे आले असून, संबंधित लिपिक हरिदास बरडे यांची विभागीय चौकशी लावण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी अहवाल तयार केला असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविण्यात येणार आहे. विभागीय चौकशीनंतर हरिदास बरडे यांचे निलंबन निश्चित मानले जात आहे. उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांपेक्षा पीएलए खात्यात जमा झालेली रक्कम यामध्ये मोठी तफावत आढळून आली. येथूनच या अनियमिततेचा भांडाफोड झाला. आता या प्रकरणात संबंधित लिपिकावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)
‘मेडिकल’च्या स्वीय प्रपंच खात्याची विभागीय चौकशी
By admin | Updated: May 8, 2015 23:53 IST