यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात तात्काळ दारुबंदी करण्यात यावी अशी शिफारस केळकर समितीच्या अहवालातही करण्यात आली आहे. याचाच आधार घेऊन प्रशासनाने येथील समाजस्वास्थ्य टिकविण्यासाठी पूर्ण जिल्हाच दारुमुक्त करणे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या धरतीवर यवतमाळातही दारुबंदी केली जावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बीअर बार, देशी दारुची दुकाने आहेत. हा परिसर औद्योगिकदृष्ट्या सक्षम असल्याने प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळतो. त्यातूनच मजूरवर्ग दारुच्या आहारी गेला आहे. व्यसनामुळे अनेकांची वाताहत झाली असून, कुटुंब देशोधडीला लागली आहे. ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलेसुद्धा दारुच्या आहारी गेलेली आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी दारुची दुकाने थाटली आहेत. ग्रामीण भागात देशी दारुची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. सहज दारु उपलब्ध होत असल्याने व्यनाधिनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर दारुबंदी केली जावी अशा मागणीचे निवेदन शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, जिल्हा परिषद सदस्य आशीष कुळसंगे, बंटी ठाकुर, शशिकांत नक्षणे, राहुल चौधरी, श्रीरंग दुरसकर, अमोल देठे, प्रवीण देवतळे, दामोधर देवतळे, कुलीराम उपरे, अनिल विठाळकर, बंडू सहारे, राजू खामकर उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदीची मागणी
By admin | Updated: January 25, 2015 23:29 IST