सचिंद्र प्रताप सिंग : खचलेल्या विहिरींचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश यवतमाळ : धडक सिंचन विहीर योजनेत गैरप्रकार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी फिक्स करून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी शनिवारी येथे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन विहीर योजनेचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी येथील बचत भवनात आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही केवळ ३५ टक्के विहिरी पूर्ण झाल्याचे पुढे आले तर काही विहिरी परस्पर विकल्याचे दिसून आले. तसेच खचलेल्या विहिरींचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले. धडक सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विभागाकडे पालकत्व देण्यात आले होते. धडक सिंचन विहिरीसोबतच नरेगाच्या विहिरींचा ही या बैठकीत आढावा घेण्यात आला. पाच हजार ७०२ विहिरींपैकी २०६ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. यासाठी आठ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांचा निधी खर्च झाला. कुशल आणि अकुशल नियमात बील अडकल्याने अनेक विहिरी अपूर्ण राहिल्याचे यावेळी पुढे आले. धडक सिंचन विहीर मंजूर झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी अडचणीमुळे शेत विकले. याप्रकरणात सातबारा ज्यांच्या नावावर होता त्यांना पैसे देण्याचे आदेश आहे. प्रत्यक्षात शेत विकल्यावर शेतकऱ्याला लाभ दिला गेला. या प्रकरणात जिल्हाधिंकाऱ्यांनी संबंधितांवर जबाबदारी फिक्स करून वसुली करण्याचे आदेश दिले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची सूचना दिली. २०१३-१४ च्या जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत १३ हजार ८०४ विहिरी खचल्या होत्या. त्यापैकी १० हजार ९८४ विहिरींचे अर्ज पंचायत समितीकडे आले होते. यामधील दोन हजार ७९५ लाभार्थी पात्र ठरले. ९७९ विहिरींना बांंधकामाची परवानगी मिळाली. या विहिरी खचल्या कशा यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संयश व्यक्त केला. संबंधित तलाठ्या मार्फत कृषी सहाय्यकाच्यावतीने त्याचे फेर सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, रोहयोचे उपजिल्हाधिकारी भाकरे यांच्यासह १६ तालुक्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिाकरी, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)गावपातळीवर काम द्याजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध आहे. त्यांना गावपातळीवर काम देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसामुळे नुकसान होणाऱ्या गावांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. याठिकाणी नाला खोलीकरण, डाळीचे बांध तयार करावे तसेच या कामात कंत्राटदारांना तूर ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी दिले.
सिंचन विहीर गैरप्रकारात जबाबदारी निश्चित करा
By admin | Updated: June 28, 2015 00:12 IST