आर्णी : उसाचे दर जाहीर केले नाही तसेच मागील वर्षी कबुली देऊनही वाढीव दर दिला नाही. त्यामुळे यावर्षी उसाचे वाढीव दर तत्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदनातून दिला आहे. आर्णी तालुक्यातील मांगूळ येथील डेक्कन साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यावर्षी अद्यापपावेतो वाढीव दर जाहीर केले नाही. त्यामुळे गत वर्षी सारखीच तोंडाला पाने पुसल्या जाऊ नये यासाठी शेतकरी वर्गाने उसाची पहिली उचल दोन हजार रुपये प्रती टन या प्रमाणे साखर कारखाना प्रशासनाने करावी असा एकमुखी ठराव या बैठकीत घेतला. तसेच उसाचे पैसे २० दिवसांच्या आत देण्यात यावे. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले प्रोत्साहन पर दर प्रती टन २०० आणि १०० रुपये हे आठ दिवसाच्या आत देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या बेन्यावरील रकमेचे व्याज आठ दिवसात परत करावे कारखान्याच्या नियमानुसार ऊस तोड वाहतुकीचे दर निश्चित केले आहे. त्याप्रमाणे आकारणी करण्यात यावी अवाजवी आकारणी शेतकऱ्यांकडून करू नये. उस वाहतुकीच्या भाड्यासंबंधी डेक्कन साखर कारखाना एकाधिकार गाजवित आहे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. असेही निवेदनात नमूद आहे. या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी प्रवीण शिंदे, अरविंद गादेवार, दीपक ठाकरे, संदीप ढोल, अतुल गुघाणे, राजु जयस्वाल, दुर्गेश ठाकरे यावेळी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
ऊस उत्पादकांचा ‘डेक्कन’ला अल्टीमेटम
By admin | Updated: November 8, 2014 22:45 IST