राजेश पुरी - ढाणकीव्यक्तीकडून काही अद्वितीय कामगिरी घडली तर त्या कामगिरीची ‘विक्रम’ म्हणून नोंद होते. या विक्रम त्या व्यक्तीला नावलौकिकाबरोबरच कधी कधी आर्थिक सुबलाही मिळवून देतो. परंतु विक्रम जर एखाद्याचं जीवन जगणचं कठीण करीत असेल तर ? याच बिकटं प्रश्नाचं उत्तर विक्रमवीर गजू काचर्डे शोधू पाहत आहे. गजानन शिवशंकर काचर्डे यांचा जन्म आणि बालपण ढाणकीतचल. सध्या तो वडिलांबरोबर विडूळ येथे राहत आहे. सर्वसाधारण बालकाप्रमाणे जन्मलेला गजानन पुढे-पुढे मात्र दिवसागणित स्थूल होत गेला. त्याचा स्थुलपणा एवढा वाढला की वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्याचे वजन भरले ८७ किलो. त्याच्या या ‘वजनदार’ विक्रमाची नोंद लिम्का बुकने घेतली. लिम्काच्या बुकमध्ये गजाननचे नाव नोंदविल्या गेले. त्याच्या नावाला बऱ्यापैकी प्रसिद्धीही मिळाली. गावोगावचे लोक येऊन ‘गजू’ची भेट घेऊ लागले. परंतु गजूचे वजन त्याच्या वयाबरोबर अतिजलदगतीने वाढणेही सुरूच राहिले. अत्यंत तुटपुंजे आर्थिक उत्पन्न असतानाही गजूच्या वडिलांनी ‘गजू’च्या वाढत्या वजनाला आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी औषधोपचार केले. परंतु त्याचे वजन काही कमी झाले नाही. आज गजू ३३ वर्षाचा झाला असून त्याचे वजन तब्बल १५० किलो आहे. आपल्या प्रचंड वजनामुळे गजूला अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तीन एकर जमीन असलेले शिवशंकर काचर्डे हे गजाननचा सांभाळ करतात. परंतु आपल्या पश्चात तो आयुष्य कसे जगणार याची चिंता त्यांना लागली आहे. १९९२ मध्ये लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये सर्वात कमी वयात जास्त वजनाचा बालक म्हणून गजूच्या नावाची नोंद झाली. त्यावेळी लोकप्रतिनिधी, समाजातील मान्यवर, चित्रपटातील तारे-तारका यांनी गजूची भेट घेऊन त्याची दखल घेतली होती. आज मात्र त्याच वाढलेलं वजन त्याचेसाठी जणूकाही ‘शाप’ ठरत आहे. शासनाने त्याला निर्वाह भत्ता किंवा विशेष मानधन देऊन त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवावा अशी मागणी होत आहे. आपणास शासनाने नोकरी उपलब्ध करून द्यावी, अशी गजाननची मागणी आहे.
प्रसिद्धीच्या झोतात आणणारे वजनच ठरतेय अभिशाप
By admin | Updated: November 20, 2014 22:59 IST