यावेळी एक वाॅर्ड व एक नगरसेवक, अशी जुनीच पद्धत राहणार आहे. ओबीसी आरक्षणाबाबत स्वतंत्र मत देण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. आता येथे डिसेंबरमध्ये होऊ घातलेली निवडणूक एक सदस्य प्रभागप्रमाणे होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार पालिकेमध्ये लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत चुरस निर्माण होईल. प्रत्येक पक्ष आपले उमेदवार उभे करतील. त्यापेक्षा अपक्षांची भाऊगर्दी होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार निवडणुकीतील ओबीसी आरक्षण यापूर्वी रद्द झाले आहे. त्यामुळे प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर आरक्षणाचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत नंतर स्वतंत्र सूचना दिल्या जातील, असे शासनाने आदेशात नमूद केले आहे.
येथील नगरपरिषदेच्या वाॅर्ड संख्येत वाढ होणार आहे. २०१६ च्या निवडणुकीत १४ प्रभागांमधून २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १२, भाजपचे दहा, शिवसेनेचे चार, काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते. आता किमान पाच वाॅर्ड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३४ नगरसेवकांची संख्या होण्याची अपेक्षा आहे.
बॉक्स
अपक्षांचा बोलबाला
नगरपालिकेचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून बरेच इच्छुक जोरात कामाला लागले आहेत. नव्या एक वाॅर्ड, एक नगरसेवक पध्दतीमुळे अपक्षांची संख्या वाढू शकते. त्यामुळे अपक्षांचे भाव वधारले जाऊ शकतात.