यवतमाळ : येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमानंद निखाडे यांच्यावर अनेक आरोप करीत कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ६ फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू आहे. यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्वरूपाचा आरोप केला आहे. याचीच दखल घेत अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी शनिवारी यवतमाळात येऊन चौकशी केली. या प्राथमिक चौकशी अहवालाची प्रत आरोग्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखाडे हे त्यांच्या वादग्रस्त कार्यशैलीमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले आहे. अधिनस्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा छळ करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय सीएस कार्यालयातून साहित्य खरेदी आणि महिला कर्मचाऱ्यांशी असलेली वर्तणूक यावरून कर्मचारी संतप्त झाले आहेत. निखाडे यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, या मागणीसाठी एनआरएचएम अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. गेल्या ११ दिवसांपासून त्यांचे हे आंदोलन सुरू आहे. निखाडे यांच्या कार्यालयीन कारभाराची चौकशी आरोग्य उपसंचालकांनी केली. याशिवाय जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडूनसुद्धा गोपनीय अहवाल मागविण्यात आला आहे. प्राथमिक स्वरूपाचा अहवाल गेल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविण्यात येणार आहे. यावर जिल्हा शल्यचिकित्सक निखाडे यांचीही बाजू ऐकून घेण्यात येईल. त्यानंतरच वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणात पुढील कारवाई होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
उपसंचालकांकडून ‘सीएस’ची चौकशी
By admin | Updated: February 18, 2015 02:14 IST