दिग्रस पालिका : लाखोंच्या कराची वसुली दिग्रस : नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहे. त्यातच उमेदवारी मिळण्याची आशा असलेल्या लोकांनी आपल्याकडील विविध थकीत कराची रक्कम भरण्यासाठी नगरपालिकेत एकच गर्दी केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकीत कर वसूल होत आहे. यातून थकबाकीदारांमध्ये सर्व सामान्यांपेक्षा श्रीमंतांचाच अधिक भरणा असल्याचे स्पष्ट होत आहे. विविध राजकीय पक्षांमधील संभाव्य उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली आहे. अनेक नेते या पक्षातून दुसऱ्या पक्षात उमेदवारीसाठी दावा करीत आहे. प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करीत आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या ६० च्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. राजकारणाचा गंधही नसलेल्या व्यक्तींंना जबरदस्तीने निवडणूक रिंगणात उतरविले जात आहे. घरपट्टी, थकीत कर पूर्णपणे भरुन निल करणे उमेदवारीसाठी अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आणि संभाव्य उमेदवार आपल्या कुटुंबामधील सर्व व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेपोटी थकीत कराचा भरणा करताना दिसत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून थकीत असलेला कर या निवडणुकीच्या निमित्ताने भराभर वसूल होत आहे. एका प्रतिष्ठीत व्यक्तीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळविताना २५ हजार रुपयांचा कर भरला. परंतु त्यांना उमेदवारीपासून वंचित रहावे लागण्याची चिन्हे आहेत. (शहर प्रतिनिधी)
इच्छुक उमेदवारांची कर भरण्यासाठी गर्दी
By admin | Updated: October 30, 2016 00:21 IST