वणी : तालुक्यातील पुनवट येथील इंडो युनिक कोलवॉशरीमधून निघणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे शेतातील पिके काळवंडली आहे. त्यामुळे कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रदूषणग्रस्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. तालुक्यातील पुनवट येथे इंडो युनिक नावाची कोलवॉशरी आहे. कंपनीने वॉशरीजवळ कोळशाचे मोठमोठे ढिगारे लावले आहे. त्याचबरोबर या कोलवॉशरीतून निघणारे कोळशाचे पाणी शेताच्या दिशेने सोडण्यात येत आहे. परिणामी पिकांची गुणवत्ता ढासळत आहे. या कोलवॉशरीच्या सभोवताल असलेल्या शेतात कापूस व इतर पिके घेण्यात आली आहेत. मात्र या वॉशरीतून निघणाऱ्या धूळ व पाण्यामुळे संपूर्ण पिके काळवंडली आहेत. रस्त्यावरही कोळशाची धूळ पसरली असून ती शेतातील पिकांवर पसरत आहे. मात्र कोलवॉशरीतर्फे रस्त्यावर पाण्याचे टँकरच फिरविण्यात येत नाही. ही कोलवॉशरी नियमांचे उल्लंघन करीत असून शेतकऱ्यांचे पीक नष्ट करीत आहे व कंपनी मात्र कोट्यावधी रूपये कमवित असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला. याप्रकरणी चौकशी करून कृषी विभागामार्फत शेतीचा सर्व्हे करण्यात यावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, प्रदूषणावर आळा बसवून दर महिन्याला गावात आरोग्य शिबिर घेण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात लुकेश्वर बोबडे, रामदास नागपूरे, रामदास डहाके, नारायण डहाके, दसरू झाडे, मधुकर बोबडे, कवडू झाडे, रत्नाकर झाडे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
कोलवॉशरीच्या धुळीने पिके काळवंडली
By admin | Updated: January 26, 2017 01:07 IST