वणी : पावसाअभावी शेती पिकांची वाढ खुंटल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या गडद छायेत सापडले आहे. आधीच दुबार, तिबार पेरणीने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी आता दुष्काळाच्या धास्तीने पुरते हादरून गेले आहे. तथापि शासन आणि प्रशासन स्तरावरून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.मारेगाव - पिके जोमाने वाढण्याच्या काळातच पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे़ त्यामुळे तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़यावर्षी पावसाळ्याला उशिरा सुरूवात झाली़ त्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा का होईना कशीबशी पेरणी आटोपली़ यात काहींनी दुबार, तिबार पेरणी केली़ त्यानंतर आलेल्या पावसाने बियाणे अंकुरले़ जुलै महिन्यात दोन आठवडे बऱ्यापैकी पाऊस पडला़ पिकांची खुंटलेली वाढ भरून काढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी पिकांना रासायनिक खताचे डोस दिले़ परंतु खतांचे डोस देताच पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिकांची अवस्था आता नाजूक झाली आहे. अल्प पाऊस, पिकांची खुंटलेली वाढ आणि खतांचा मिळालेला डोस, यामुळे पिकांची वाढ होण्यापेक्षा पिके आता पावसाअभावी सुकू लागली आहेत़ तालुक्यातील नवरगाव, बोटोणी, वेगाव मारेगाव या मंडळात पिकांची स्थिती अतिशय नाजूक आहे़ या भागात गेल्या दोन महिन्यात अतिशय अल्प पाऊस झाला़ त्यामुळे बियाणे कसेबसे अंकुरले, मात्र पिकांमध्ये जोम नाही़ त्यातच गेल्या काही दिवसात पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. महसूल प्रशासनाने या भागातील पिकांचे पंचनामे करून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे़ अन्यथा या परिसरातील शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. पांढरकवडा - कोरडा व ओल्या दुष्काळामुळे गेल्या दोन वर्षांपासून नापिकीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांवर यावर्षीही अत्यल्प पावसामुळे पुन्हा दुष्काळाची छाया गडद झाली आहे़ त्यामुळे तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे़ निम्माअधिक पावसाळा संपूनही पावसाने दमदार हजेरी न लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. आधीच शेतकऱ्यांना अल्प प्रमाणातील पावसामुळे दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागला. दुबार पेरणीनंतर पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती़ मात्र आॅगस्टचा दुसरा आठवडा संपत आला असूनही पावसाने दमदार हजेरी न लावल्याने अनेक शेतात बियाणे उगवलेच नाही़ मध्यंतरी अल्पशा पावसाच्या भरवशावर काही ठिकाणी बियाणे अुंकरले. मात्र तेही आता सुकू लागले आहे. अनेक ठिकाणी पिके अजूनही जमिनीबाहेर निघत आहे़ कशाबशा पाण्याची सोय करत जगवलेल्या कपाशीलाही योग्य वातावरण व नंतर आवश्यकतेनुसार पुरेसा पाणी मिळत नसल्याने रोगरोईची मालिका सुरू झाली आहे़ नापिकीमुळे आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी पुन्हा कर्ज काढून दाग-दागिने गहाण ठेवून किंवा विकून शेतात पेरणी केली़ मात्र पावसाअभावी मातीत टाकलेले लाखो रूपये मातीतच जाण्याची वेळ आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे़ काहींची अंकुरलेली पिकेही आता सुकू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे़ तालुक्यातील खुनी, पैनगंगा व इतर छोट्या-मोठ्या नद्या, नाले कोरडे झाले आहे़ सायखेडा धरणातही मर्यादित पाणी आहे़ पिण्याचे पाणी, चाऱ्याची टंचाई, नापिकीची तिव्रता जाणवू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होत आहे. राजकीय मंडळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत मश्गूल आहे़ दुष्काळाची छाया गडद होत असताना प्रशासन स्तरावर कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे़ (प्रतिनिधी)
शेती पिकांची वाढ खुंटली
By admin | Updated: August 14, 2014 00:07 IST