महागाव : बांधकामात अनियमितता आणि निकृष्ट दर्जाची कामे आढळल्यास कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह कंत्राटदारांंवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांनी दिला आहे. उखडलेल्या रस्त्यांची आणि रस्ते बांधकामाची स्थिती पाहण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता महागाव तालुक्यातील रस्त्यांची अवस्था पाहून त्यांनी हा इशारा दिला. मुख्य अभियंता पी.एस. मंडपे, अधीक्षक अभियंता रमेश होतवाणी यांनी शुक्रवारी पुसद, महागाव, दिग्रस तालुक्यातील विविध कामांची पाहणी केली. नवीन कामे प्रस्तावित करणे आणि जुन्या कामांच्या दुरुस्तीसाठी तांत्रिक मान्यता देण्यासंदर्भात त्यांचा हा दौरा होता. काही कामांमध्ये अनियमितता तर काही कामांमध्ये तक्रारी आढळून आल्या. अनेक कामे प्रलंबित असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. पुसद, माहूर मार्गाची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी रस्त्यावर दीड बाय दीड फुटाचे खड्डे खोदून नमुने घेतले. सदर नमुने परीक्षणासाठी पाठविले जाणार आहे. यावेळी त्यांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना मापदंडाप्रमाणे रस्त्याचे काम करण्याचे आदेश दिले. तसेच कोणतेही काम तत्काळ करा, बोगस व निकृष्ट काम करणाऱ्यांची गय नाही, असे सांगत कामात अनियमितता आणि निकृष्ट कामे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाईचाही इशारा दिला. त्यामुळे सबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान महागाव येथे आमदार राजेंद्र नजरधने, कंत्राटदार विजयराव देशमुख, दीपक आडे यांनी मुख्य अभियंत्यांची भेट घेऊन तालुक्यातील रस्त्यांच्या समस्या सांगितल्या. विविध पुलांची पाहणी करून दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधितांना दिले. मुख्य अभियंत्याच्या या दौऱ्याने बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली होती. या दौऱ्यादरम्यान मुख्य अभियंत्यांसोबतच अभियंता रवींद्र मालवत, प्रमोद खराबे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
निकृष्ट काम आढळल्यास संबंधितांवर फौजदारी
By admin | Updated: November 15, 2014 22:54 IST