यवतमाळ : बीएसएनएलमधील कंत्राटी पद्धत बंद करा व कंत्राटी कामगारांना बीएसएनएलच्या आस्थापनेवर सामावून घ्या, या प्रमुख मागणीसाठी बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांनी दिल्लीच्या संसदेवर देशव्यापी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना आस्थापनेवर सामावून घ्या, या मागणीसोबतच जाणीवपूर्वक कामावरून काढलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर सामावून घ्या, कामगारांची कपात बंद करा, कामगारांप्रती आकसबुद्धी व सूडभावनेचा वापर थांबवा, कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, श्रम मंत्रालय व सीएमडी कार्यालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा, रुपये १८ हजार किमान वेतनाची अंमलबजावणी करा, समान कामासाठी समान वेतन अदा करा, ईपीएफ, ईएसआय व ग्रॅज्युईटी आदी सामाजिक सुविधा प्रदान करा, बीएसएनएलचे खासगीकरण करू नका आदी मागण्यांसाठी बुधवार, २२ फेब्रुवारीला बीएसएनएलमध्ये १७ वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी दिल्लीच्या संसदेवर देशभरातील बीएसएनएलचे सर्व कंत्राटी कामगार देशव्यापी मोर्चा काढणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ६० कामगार यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती बीएसएनएल लेबर अॅन्ड कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियनचे महाराष्ट्र परिमंडळ सचिव नरेंद्र वाकोडे व जिल्हा सचिव विष्णू वानखडे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
बीएसएनएल कंत्राटी कामगारांचा देशव्यापी मोर्चा
By admin | Updated: February 18, 2017 00:35 IST