महागाव कसबा : सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. खर्च अडीच हजार असताना उत्पन्न मात्र दोन हजार रुपयांचे होत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. येरव्ही सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरणी केल्यानंतर आठ ते दहा क्विंटल होणारे उत्पन्न आता केवळ ८० किलोवर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा सुरूवातीलाच पावसाने दडी मारली. त्यानंतर सुरळीत पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र पुन्हा पावसाने दगा दिल्यानंतर अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उशिरा पेरणी झाल्याने आणि वातावरणातील बदलाने उत्पन्नात कमालीची घट झाली. एरव्ही ३० किलो सोयाबीन बियाण्याची लागवण केली की त्यापासून आठ ते दहा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न व्हायचे. मात्र यावर्षी ३० किलोला ८० किलो अशी सोयाबीनची उतारी आहे. त्यातच सोयाबीन काढणीचा खर्च प्रती बॅग १ हजार ५०० रुपये झाला आहे. मशीन आणि ट्रॅक्टरचा खर्च एक हजार रुपये असा २ हजार ५०० रुपये खर्च आहे. याव्यतिरिक्त लागवण आणि मजूरीचा खर्च वेगळा असे असताना काढणीचाच खर्च २ हजार ५०० रुपये उत्पन्न मात्र २ हजार रुपये अशी परिस्थिती तालुक्यात सर्वदूर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेकांनी सोयाबीनची ही उतारी पाहून त्यामध्ये जनावरे सोडणेच पसंत केले. दिवाळी हा सण सर्वांसाठीच महत्वाचा. तीन दिवसांवर हा सण येऊन ठेपला असताना पैशाची तजवीज करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. नातेवाईक, आप्तेष्ट, सावकारांचे कर्जासाठी उंबरठे झिजविले जात आहे. असे असताना प्रशासनाकडून या गंभीर परिस्थितीची कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. वास्तविक सोयाबीन पिकाचा आतापर्यंत सर्वे व्हायला हवा होता. तसेच शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी अशी आर्थिक मदत करून त्यांना दिवाळी सणापूर्वी दिलासा द्यायला हवा होता.
खर्च अडीच हजार, उत्पन्न मात्र दोन हजार
By admin | Updated: October 20, 2014 23:20 IST