लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने खाली आली आहे. मात्र कोरोना संपलेला नाही. उलट संख्या कमी असली, तरी रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात चढउतार नोंदविला जात आहे. त्यामुळे थाेडेसेही दुर्लक्ष अंगलट येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.जून महिन्याच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यात रुग्णवाढ रोडावली आहे. परंतु, संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही. दररोज दहा ते पंधरा रुग्ण आढळत आहेत. तर एक-दोन दिवसाआड एखाद्या रुग्णाचा मृत्यूही नोंदविला जात आहे. जिल्ह्यात ७ जूनपासून संपूर्ण अनलाॅक करण्यात आले आहे. सर्व व्यवहार निर्बंधांशिवाय सुरळीत सुरू आहेत. परंतु, रुग्ण आढळण्याचा रतीब कमी झाला तरी कायम आहे. रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. मात्र एक-दोन दिवसाआड हे दोन्ही आकडे वाढताना-उतरताना दिसत आहेत.
रविवारी ११ पाॅझिटिव्ह, ३९ कोरोनामुक्त- रविवारी जिल्ह्यात ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर ३९ जण कोरोनामुक्त झाले. पाॅझिटिव्ह आलेल्या ११ जणांमध्ये दारव्हा येथील एक, घाटंजी दोन, महागाव एक, पुसद दोन, वणी चार व यवतमाळ येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार शुक्रवारी एकूण ८९० पैकी ८७९ अहवाल निगेटिव्ह आले. सध्या जिल्ह्यात ८२ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ हजार ६३६ आहे. तर बरे झालेल्यांची एकूण संख्या ७० हजार ७६८ इतकी आहे. एकूण १७८६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सहा लाख ७३ हजार १४ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी सहा लाख ३३१ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १०.७९ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १.२४ आहे. तर मृत्युदर २.४६ टक्के आहे.
सध्या आपल्याकडे कोरोनाचे नगण्य रुग्ण आहे. जे रुग्ण ॲडमिट आहे, त्यांना पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याशिवाय आपण घरी पाठवतच नाही. कोरोना संसर्गाचा चढउतार आपण यापूर्वीही पाहिला आहे. त्यामुळे सध्या रुग्ण कमी झाले असले तरी सर्वांनी शंभर टक्के लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाची त्रिसूत्रीही पाळली पाहिजे.- डाॅ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्य चिकित्सक