लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेले काही दिवस जिल्ह्याला जेरीस आणणाऱ्या कोरोना विषाणूची घसरगुंडी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. आठवडाभरापासून नव्या रुग्णांची संख्या घटत असताना गुरुवारी नव्या पाॅझिटिव्हचा आकडा दीडशेच्याही खाली म्हणजे १४४ इतकाच नोंदविला गेला. तर दहाहून अधिक बळींचा सपाटाही थंडावला असून गुरुवारी चार बळी नोंदविले गेले. दरम्यान २८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांनी अजूनही निष्काळजीपणे फिरणे धोक्याचे ठरू शकते.गुरुवारी झालेल्या चार मृत्यूंपैकी दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. बाभूळगाव तालुक्यातील ६१ वर्षीय महिला व ७२ वर्षीय पुरूषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात महागाव तालुक्यातील ५२ वर्षीय पुरूष आणि पुसद तालुक्यातील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या १४४ जणांमध्ये ९२ पुरुष आणि ५२ महिला आहेत. यात आर्णी येथील ५, बाभूळगाव येथील ७, दारव्हा येथील १९, दिग्रस येथील २०, घाटंजी येथील ४, कळंब येथील २, महागाव येथील १, मारेगाव येथील ४, नेर येथील ६, पांढरकवडा १, पुसद येथील १७, राळेगाव १, उमरखेड ४, वणी येथील २२, यवतमाळ २९, झरी जामणी १ आणि इतर शहरातील १ रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.
पाच हजारांवर अहवाल निगेटिव्ह जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार, गुरुवारी एकूण ५२९६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४४ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ५१५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२६१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १०६४ रुग्णालयात भरती आहेत. तर ११९७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१ हजार ४२६ झाली आहे. २४ तासात २८९ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६७ हजार ४२० आहे. तर जिल्ह्यात एकूण १७४५ मृत्यूची नोंद आहे.
सहा लाखांवर चाचण्या, सव्वापाच लाख निगेटिव्हजिल्हयात आतापर्यत सहा लाख दोन हजार ४६३ चाचण्या झाल्या. त्यापैकी पाच लाख २९ हजार ७४२ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.८६ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.७२ आहे. तर मृत्युदर २.४४ इतका आहे. मृत्यूदर अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे काळजी कायम आहे.