पूसद : कोरोनाच्या दहशतीमुळे शहरालगतच्या शेलू (बु.) येथील श्यामसुंदर व कारंजा (लाड) येथील काकडे परिवारातील विवाह ठरलेल्या तिथीला न होता तातडीने साक्षगंधात उरकण्यात आला. अवघ्या चार-पाच तासांत साक्षगंधासह विवाह सोहळा संपन्न झाला.
शेलू (बु.) येथील गजानन श्यामसुंदर यांची मुलगी कोमल हिचा विवाह कारंजा (लाड) येथील माजी नगराध्यक्ष संजय काकडे यांचा मुलगा लेखराज याच्यासोबत २ मे रोजी पूसद येथे ठरला होता़. त्यानुसार साक्षगंधासाठी कोमल व लेखराज यांचे आई-वडील व ठराविक पाहुणे हे शेलू (बु.) येथे पाहोचले, नंतर साक्षगंध झाला.
या साक्षगंधात कारंजाचे माजी नगराध्यक्ष संजय काकडेसह इतर मंडळींनी मध्यस्थी करून कोरोनाच्या साथीमुळे विवाहास गर्दी करता येणार नाही, असे पाहुण्यांना समजावून सांगितले. त्यांनी त्वरित लग्न करण्याचे ठरविले. लागलीच मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता विवाह सोहळा साध्या पद्धतीने उरकण्यात आला. केवळ आलेल्या २५ पाहुण्यांना जेवण देण्यात आले. विवाहात होणाऱ्या गर्दीमुळे पाहुण्यांना त्रास नको, या भावनेतून हे शुभमंगल उरकण्यात आले. यात कसलीही खरेदी नाही, बस्ता नाही, वाजंत्री, घोडे नाहीत, पाहुणे, रावळे यांचा मानपान नाही. विवाह सोहळ्यासाठी ठरवलेले मंगल कार्यालय, छापायला टाकलेल्या लग्नपत्रिका रद्द करण्यात आल्या. वर, वधूनेही अगदी साधे घरगुती कपडे घातले होते. मात्र, सर्वांचाच उत्साह जोरात होता.