ंनेर : घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरीत्या साठा करून काळाबाजार केला जात आहे. सिलिंडरची जादा दराने विक्री करणारे तालुक्यात सक्रिय झाले आहेत. शिवाय गॅसकीटवर चालणार्या वाहनांना रिफिलिंग करून देण्याचा व्यवसाय तेजीत आला आहे. मात्र या गंभीर बाबीकडे लक्ष दिले जात नसल्याने गॅसधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील सिलिंडरधारकांचे कार्ड गोळा करून मिळणार्या सिलिंडरची उचल केली जात आहे. याशिवाय एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तीच्या नावाने स्वतंत्र रेशनकार्ड तयार करण्यात आले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या नावाने गॅसचे कार्ड गोळा केले आहे. वर्षभरात १२ सिलिंडर एका कार्डावर दिले जातात. नेमक्या याच बाबीचा फायदा घेत गॅसकीटवर चालणार्या वाहनात सिलिंडरमधील गॅस रिफिलिंग करून दिले जाते. यासाठी ६०० ते ७०० रुपये आकारले जातात. सिलिंडर असले तरी कार्ड नसल्याने अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दरात गॅस सिलिंडर घ्यावे लागते. शहरात गॅस घरपोच द्यायला पाहिजे. मात्र अनेकांना गोदामातून सिलिंडर आणण्याचा सल्ला दिला जातो. आॅटोरिक्षाचालक ५० रुपये भाडे घेतो. घरपोच सिलिंडर मागविले तर २० रुपये द्यावे लागते. नवीन कनेक्शनसाठीचे दरही कमालीचे वाढविण्यात आले आहे. नियमानुसार चार हजार ८०० रुपयात नवे कनेक्शन मिळायला पाहिजे. मात्र पाच हजार ८०० ते सहा हजार रुपये घेतले जातात. गॅसधारकांची ही लूट होत असताना त्याला पावती मात्र चार हजार ८०० रुपयांचीच दिली जाते. यानंतरही पावतीसाठी येरझारा माराव्या लागतात. बहुतांश ठिकाणी भरलेले सिलिंडर तत्काळ मिळते. येथे मात्र टंचाई भासविली जाते. काळ्या बाजारात मात्र गॅस नियमित उपलब्ध असते. अवैधरीत्या साठा करून हजारोंची कमाई केली जात आहे. यावर कारवाईची तरतूद आहे. मात्र अशा प्रकारात अपवादानेच कारवाई झाली आहे. आरटीओ विभागाकडूनही गॅस सिलिंडरवर चालणार्या वाहनांची तपासणी केली जात नाही. अनधिकृतरीत्या गॅसकीट लावली असलेली वाहने अनेक आहेत. त्यात घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस रिफिलिंग करून वापरला जातो. मात्र ही बाब दुर्लक्षित केली जात आहे. हॉटेलमध्येसुद्धा गॅस सिलिंडरचा वापर प्रचंड वाढला आहे. यावरही कारवाई होत नाही. (तालुका प्रतिनिधी)
स्वयंपाकाचा गॅस काळ्या बाजारात
By admin | Updated: May 18, 2014 23:57 IST