यवतमाळ : वीज कंपनीकडून ग्राहकांना योग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार सातत्याने होत असते. याला विविध कारणे असली तरी जिल्ह्यात वीज कंपनीमध्ये असलेले मोठ्या प्रमाणात रिक्त पदे हे देखील महत्वाचे कारण आहे. तब्बल १८९ पदे रिक्त आहेत. वीज कंपनीवरील वाढत्या कामाचा ताण पाहता नवीन पदे निर्माण करण्याची गरज असताना आहे ती पदे देखील रिक्त असल्यामुळे ग्राहकांना योग्य व वेळेवर सेवा मिळत नाही. ग्राहकांच्या तक्रारींची वेळेत दखलही घेतली जात नाही. जिल्ह्यात यवतमाळ, पुसद व पांढरकवडा या तीन सर्कलअंतर्गत वीज कंपनीचे कार्य चालते. या तीनही सर्कलमध्ये एकूण सर्व वर्गवारीतील १७८५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या १५९९ पदे भरली आहेत तर १८९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे विविध कामे खोळंबतात त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे. विशेषत: ग्रामीण भागात एकाच वायरमनकडे अनेक गावे असल्यामुळे वेळेवर डीपी अथवा खांबावरील कामे केली जात नाहीत. त्यामुळे आधीच भारनियमन आणि त्यातही बिघाड झाल्यास नागरिकांना अनेक दिवस अंधारात काढावे लागतात. यवतमाळ, पुसद व पांढरकवडा या तीनही उपविभागांचा एकत्रित विचार केल्यास उपकार्यकारी अभियंत्यांची चार पदे रिक्त आहेत. सहाय्यक अभियंत्यांचा १५ पदे, सहाय्यक प्रोग्रॅमरची एक पद, उपव्यवस्थापक सहा पदे, कनिष्ठ अभियंत्यांची आठ पदे, सहायक दक्षता अधिकाऱ्याचे एक पद, सहाय्यक लेखाधिकाऱ्याची तीन पदे, मुख्य लिपिकाचे एक पद, युडीसी (एसी) २४ पदे, कार्यालयीन सहाय्यक १३ पदे, वेगवेगळ्या विभागांचे आॅपरेटर्स आठ पदे, वाहनचालकांची दोन पदे, वरिष्ठ तंत्रज्ञ २८ पदे, मुख्य तंत्रज्ञ सहा पदे, तंत्रज्ञ ४८, कनिष्ठ तंत्रज्ञ २१ व शिपायाची सात अशी जवळपास १८९ पदे रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या वीज कंपनीतील रिक्त पदांमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना वेळेवर व योग्य सेवा मिळत नाही. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष दे्ण्यास तयार नसल्याचे दिसते. (प्रतिनिधी)एकीकडे ग्राहकांना वीज कंपनीकडून योग्य सेवा मिळत नाही. कोणताही बिघाड झाल्यास अनेक दिवस तो दुरूस्त केल्या जात नाही. त्यामुळे ग्रामीण जनतेला अंधारात रात्र काढावी लागते. सबंधितांकडे तक्रार नोंदविल्यास वेळेवर वायरमनला पाठविले जात नाही. याबाबत अधिक्षक अभियंता विजय भटकर यांच्याकडे विचारणा केली असल्यास आम्ही प्रत्येक विभागातील सबंधितांचे तसेच वरिष्ठांचे मोबाईल क्रमांक सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी जाहीर केले आहेत, रिक्त पदे असली तरी आम्ही ग्राहकांना योग्य सेवा देण्यास कटीबद्ध आहोत, परंतु तक्रारीच येत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ग्राहकांच्या तक्रारींसाठी १८००२३३३४३५ व १८००२००३४३५ हे टोल फ्री क्रमांक आहेत. शिवाय नियंत्रण कक्ष ०७२३२-२४२३१८ व ०८९७५००२५७१, सर्कल कंट्रोल रूम ०७८७५७६३०९९ या क्रमांकावरही वीज ग्राहक तक्रारी नोंदवू शकतात.
ग्राहक त्रस्त : तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याचा आरोप
By admin | Updated: September 9, 2015 02:37 IST