यवतमाळ : नोटबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी अडचणीत आले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला अधोगतीकडे नेण्यात येत आहे. नोटबंदी करून सामान्य माणसांचा पैसा बँकेत भरून घेतला. याच पैशातून मोठ मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले, असा आरोप जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात केला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी सरकारचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जनआक्रोश मोर्चा हा पोस्टल मैदानातून निघाला. यात शेतकरी, शेतमजूर आणि काँग्रेसची सर्वच नेतेमंडळी उपस्थित होती. मोर्चा नेताजी चौक, दत्त चौक आणि बसस्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. येथे विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार कीर्ती गांधी, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच सोमवारी जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकेसमोर आंदोलन करण्याचे आवाहन श्याम उमाळकर यांनी केले. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मोर्चात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)
नोटाबंदी विरोधात कचेरीवर काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा
By admin | Updated: January 7, 2017 00:19 IST