यवतमाळ : माजी खासदार उत्तमराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा गट काँग्रेसवासी होण्याच्या तयारीत आहे. दादा गटाने बुधवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी या संपूर्ण घडामोडीत पुढाकार घेतला. मुख्यमंत्र्यांशी ४० मिनिटे चर्चा झाल्यानंतर मनीष पाटील व समर्थकांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी दर्शविली. तत्पूर्वी २३ सप्टेंबर रोजी लोणीतील फार्म हाऊसवर समर्थकांची बैठक घेऊन नंतर निर्णय जाहीर करू, असे सांगण्यात आले. राष्ट्रवादीत कोंडी होणाऱ्या या दादा गटाला मोघे-पुरकेंनी हेरले. या दोनही नेत्यांना आपला विधानसभेतील विजयाचा मार्ग सूकर करण्यासाठी दादा गटाची साथ लाभणार आहे. म्हणूनच त्यांनी या गटाच्या काँग्रेस प्रवेशासाठी धडपड चालविली होती. प्रत्यक्ष निवडणुकीत या ‘इनकमिंग’चा काँग्रेसला किती फायदा होतो हे १९ आॅक्टोबरनंतरच स्पष्ट होईल. (जिल्हा प्रतिनिधी)
‘दादा’ गट होणार काँग्रेसवासी
By admin | Updated: September 18, 2014 00:08 IST