पुसद : भाजपा खोटी आश्वासने देवून सत्तेत आली. देशाला भुलवून स्वत: सत्तेच्या झोक्यात झुलत आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज करणे ही काँग्रेसची परंपरा नाही. सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने आपल्या राजवटीत देशातील शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव तथा माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी येथे केले. पुसद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अॅड. सचिन नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपा सत्तेवर आली. मात्र त्यांनी निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. जीवनावश्यक वस्तूंचे भाव, रेल्वेभाडे १४ टक्क्याने वाढल्याचे सांगत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची अस्मिता महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज असून मराठी बांधवांना विकासाचे मॉडेल हवे असेल तर ते महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आहेत. एक अन्नदाता जो सर्वांचं पोट भरतो आणि दुसरा मतदाता माणसाला नेता बनवितो त्यांना अतिशय महत्त्व आहे. येणाऱ्या निवडणुकीत बदल हवा असेल तर राहुल गांधी यांच्या ब्रिगेडमधील अॅड.सचिन नाईक यांना निवडून पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. मध्य प्रदेश निवासी ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या मराठी भाषणामुळे उपस्थित जनसमूदाय प्रभावीत झाला. यावेळी उमेदवार अॅड.सचिन नाईक, राहुल गांधी टिमचे विनोद राठोड (हिमाचल प्रदेश), नसीम खान (मध्य प्रदेश) यांनीही सभेला संबोधित केले. यावेळी माजी आमदार अॅड. अनंतराव देवसरकर, आमदार हरिभाऊ राठोड, डॉ.मोहमद नदीम, महेश खडसे, अजय पुरोहित, पुंडलिक टारफे, उपसभापती अवधूत मस्के, अनिल शिंदे, जकी अन्वर, अॅड.गजानन देशमुख आदी उपस्थित होते.
काँग्रेसने ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले
By admin | Updated: October 11, 2014 02:16 IST